आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करुन जाणारे काही लोक असतात. ज्यांचे अस्तित्व जनता विसरु शकत नाही. सामाजिक कार्यापासून शैक्षणिक कार्यापर्यंत गोरगरीबांच्या प्रश्नांपासून महाराष्ट्र, कर्नाटक सिमा प्रश्नापर्यंत, छोडो भारत चळवळीपासून ते निझामाच्या जुलमी राजवटीतून हैदराबाद, कर्नाटक मुक्त करण्यासाठीचा लढा असो यासाठी झटलेल्या व शंभरी पार केलेल्या केशवराव निटूरकर यांनी दोन्ही राज्यांच्या सिमेवर वेगळी छाप पाडून नवा आशय निर्माण केला.
कर्नाटक विधानसभेचे माजी उपसभापती ज्येष्ठ विधीज्ञ केशवराव निटूरकर यांचे नुकतेच भालकी येथे निधन झाले.
तत्वनिष्ठ राजकारणी व्यक्तीमत्व अशी लोकांमध्ये ओळख असलेले केशवराव निटूरकर यांचं नुकतच निधन झालं. वयाची १०० वर्षे उलटून गेले तरी समाजसेवेचा त्याांचा उत्साह उल्लेखनीयच नव्हे तर अनुकरणीय आहे.
केशवराव निटूरकरांचा जन्म ९ डिसेंबर १९२३ रोजी बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्याच्या निटूर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तात्याराव होते व आईचे नाव गोदावरी होते. केशवरावांना पाच भाऊ व तीन बहिणी होत्या. बालपणी आई वडिलांनी केशवरावांवर चांगले संस्कार केले. केशवरावांचे प्राथमिक शिक्षण निटूरमध्ये सुरु झाले. निटूरमध्ये पहिली इयत्ता पास झाल्यानंतर ते गुलबर्ग्याच्या नुतन विद्यालयात दाखल झाले. तिसर्या इयत्तेतील शिक्षण केशवरावांनी बिदरमध्ये उत्तीर्ण केली. चौथी ते पदवीपर्यंतचे शिक्षण केधवरावांनी हैदराबाद येथे घेतले. हैदराबादच्या हिजलाफ या महाविद्यालयातून केशवरावांनी बी.ए.ची पदवी प्राप्त केली व नागपूरमध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळविली. पदवी मिळविल्यानंतर केशवरावांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यावेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल या नेत्याांचा केशवरावांवर खूप प्रभाव होता. ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी करो या मरो चा संदेश दिला. इंग्रजांना छोडो भारत असा आदेश गांधींनी दिला. गांधींनी सुरु केलेल्या या आंदोलनात केशवरावांनी सक्रिय सहभाग घेतला. परिणामी केशवरावांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर केशवरावांनी निझामाच्या जुलमी राजवटीतून हैदराबाद कर्नाटक मुक्त करण्यासाठीच्या आंदोलनात भाग घेतला.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या जन्मगावी समाजकार्य करण्याचा त्यांनी निश्चय केला. आपल्या जन्मगावी येऊन त्यांनी आपल्या जन्मगाासह पंचक्रोशीच्या विकासासाठी कार्य केले. १९५८ मध्ये भालकी या पदवीधर मतदारसंघातून ते निवडून आले. ही त्यांच्या राजकीय कार्याची सुरुवात. १९६२ मध्ये ते बिदर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. १९६६ मध्ये ते पुन्हा आमदार झाले. १९६८ मध्ये माणिक पब्लिक स्कूल, माणिकनगर ते अध्यक्ष झाले. १९७२ ला जिल्हा परिषदेतून निवृत्ती घेतली. १९८० मध्ये ते भालकी बार असोसिएशनचे ते अध्यक्ष झाले. १९८६ ते बिदर जिल्हा खादी ग्रामोद्योगचे ते अध्यक्ष झाले. २००५ मध्ये ते महात्मा गांधी सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष झाले. २००५ नंतरच्या दशकामध्ये त्यांनी त्यांच्या निटूर या जन्मगावाच्या विकासासाठी स्वतःस झोकून दिले. निटूरमध्ये बसस्टँड, प्राथमिक आरोग्य केंद्र या सुविधा केशवरावांनी उपलब्ध करुन दिल्या. पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेचे काम केशवरावांमुळेच पूर्ण झाले.
घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी ही काव्यपंक्ती केशवरावांच्या गावाच्या विकासाबाबत अगदी संयुक्तीक आहे. केशवरावांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरावर नेतृत्व केले असले तरी त्यांचे संपूर्ण लक्ष निटूर गावच्या विकासाकडे असते. निटूर गावात पायाभूत सोयी आणल्याचे श्रेय सर्वस्वी केशवरावांना जाते. निटूर आणि कुडली यांना जोडणारा मांजरा नदीवरचा पूल केशवरावांच्या पाठपुराव्यामुळे आता पूर्णत्वाकडे जात आहे.बिदरमध्ये आठव्या वर्गास मान्यता हा विषय केशवरावांनी सातत्याने प्रयत्न करुन मार्गी लावला.
शिक्षकांसाठी केशवरावांनी केलेले काम केवळ असाधारण आहे. कर्नाटक विश्वविद्यालयात शिक्षकांना युजीसी प्रमाणे वेतन मिळावे यासाठी केशवरावांनी संघर्ष केला. त्यास आता यश आले. कितूर चेनम्मा महाविद्यालयात मुख्याध्यापिकेची नियुक्ती निटूरकर यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर केशवरावांनी सकारात्मक भूमिका घेऊन विधानसभेत अनेकदा चर्चेत भाग घेतला. त्रिभाषा सूत्रांचे तंतोतंत अनुपालन व्हावे आणि राष्ट्रभाषा हिंदीचे अध्ययन सक्तीचे व्हावे यासाठी केशवराव नेहमी आग्रही राहिले आहेत.
निटूर गावातील विकास योजनांप्रमाणेच बिदर जिल्ह्यात जलसंधारण योजना कार्यान्वित करण्याचे श्रेयही केशवरावांनाच द्यायला हवे. १९७२ मध्ये मांजरा नदीवर एक उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यात केशवरावांचा सिंहाचा वाटा आहे. या सिंचन योजनेमुळे ८०० एकर जमीन ओलिताखाली आली आहे.
शिक्षकांना कोठारी आयोगानुसार वेतन देण्यात यावे यासाठी केशवरावांनी सरकार दरबारी आपले वजन वापरुन शिक्षकांना कोठारी आयोगानुसार वेतन उपलब्ध करुन दिले.
-विजय जोशी,
लेखक हे दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी आहेत.