नांदेड -गेल्या ३० वर्षांपासून सर्व भारतीयांच्या,शोषित – बहुजनांच्या जीवन संघर्षाचे वास्तववादी, ज्वलंत चित्रण करणाऱ्या अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती करून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळविणारी महाराष्ट्रातील ख्यातनाम नाट्य संस्था ‘ आई क्रिएशन्स,नांदेड ‘ आणि ‘ सूर्यमुद्रा फाऊंडेशन,नांदेड ‘ आयोजित १४ दिवसीय ‘ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिर (पर्व दुसरे) ची उत्साहात सांगता झाली.
आजपर्यंत १००० हून अधिक कलावंतांना नाट्य प्रशिक्षण देत त्यांना नाट्य – सिने क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात कार्यप्रवण करणारे ह्या शिबिराचे मुख्य संयोजक सुप्रसिध्द नाट्य लेखक,दिग्दर्शक डॉ.विलासराज भद्रे ह्यांच्या नेतृत्वात १ ते १४ जानेवारी ह्या कालावधीत संपन्न झालेल्या ह्या शिबिरात २५ कलावंतांनी सहभाग घेतला.त्यांना सुप्रसिध्द नेपथ्यकार लक्ष्मण संगेवार,सुप्रसिध्द प्रकाश योजना तज्ज्ञ प्रा. कैलास पुपुलवाड,अशोक माढेकर (नांदेड),सिने अभिनेता कपिल गुडसुरकर,सिने दिग्दर्शक कुणाल गजभारे (मुंबई),शॉर्ट फिल्म दिग्दर्शक सचिन केरुरकर(पुणे),अभिनेते सुनील ढवळे (परभणी ) आणि डॉ. विलासराज भद्रे ह्या ख्यातनाम सिने – नाट्य दिग्गजांनी मार्गदर्शन केले.नाट्यशास्त्र,कला,त्यातील महत्त्वाचे घटक आणि तंत्र ह्यासोबत नाटक,सिनेमा आणि शॉर्ट फिल्म ह्याचे विशेष मार्गदर्शन असा त्रिवेणी संगम ह्या शिबिरात झाल्याने सर्व शिबिरार्थीनी प्रचंड समाधान व्यक्त केले.महाप्रजापती माता गौतमी बुद्ध विहार सभागृहात संपन्न झालेल्या ह्या शिबिरात दररोज ३ ते ४ तास सर्व कलावंतांनी तल्लीन होऊन ज्ञानसाधना केली.अनेक अडचणी,प्रतिकूल परिस्थितीतही हे शिबिर यशस्वी झाल्याबद्दल समन्वय समितीने सर्वांचे ऋण व्यक्त केले.
ह्या शिबिराच्या यशस्वितेसाठी आनंद कांबळे,कृष्णा गजभारे,तेजाब पाईकराव, सिद्धार्थ कांबळे,कु.प्रांजल मोतीपवळे, नीलाक्षी सुनील नेत्रगावकर,अरविंद गवळे,शंकर गायकवाड, अजय सावंत,अमोल सावंत,अर्णव गोलेर,वंश सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले.ह्या शिबिरास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेटी देऊन तरुणाईला विधायक वळण देणाऱ्या ह्या उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.