नांदेड- पोलीस पाटील हा गांव पातळीवर काम करणारा महत्वाचा घटक आहे. पोलीस पाटलांना गावातील प्रत्येक माणसाची व घटनांची खडानखडा माहिती असते. सदर माहितीचा उपयोग चुकीच्या घटना टाळण्यासाठी व्हावा, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भेटी दरम्यान केले. यावेळी त्यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करून गाव पातळीवरील सर्व घटनांची इत्यंभूत माहिती पोलिसांना शिग्रतेने द्यावी, अशा सूचना केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम दिला असून या अंतर्गत, पोलीस स्टेशन येथील स्वच्छता, साफसफाई, मुद्देमाल निर्गती, नागरिकांच्या प्रश्नांची शिग्रतेने सोडवणूक, व्यापार व उद्योगांना पोषक वातावरण तयार करणे या अनुषंगाने परिक्षेत्रात कामकाज सुरू आहे. सदर कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आज रोजी शहाजी उमाप यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे भेट करून पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली व अधिकारी/ अंमलदारांना मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस पाटील यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना, गांव पातळीवर पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व कार्यकारिणी, दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्या, ग्राम सुरक्षा दले इत्यादींचे गावाच्या जडणघडणीतील महत्त्व त्यांनी विशद केले. गांव पातळीवर चालत असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांची व संभाव्य कायदा सुव्यवस्था प्रश्नांची माहिती पोलीस पाटलांनी योग्य वेळेत पोलिसांच्या पर्यंत पोहोचवावी, अशा अपेक्षा पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केल्या.
यावेळी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण च्या हद्दीतील सर्व गावांच्या हद्दीतील अवैध व्यवसाय, वाळू उपसा यासह संभाव्य कायदा सुव्यवस्था प्रश्नांची त्यांनी माहिती घेतली व या कामी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज विशद केली.
सदर भेटीवेळी, इतवारा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावांतील पोलीस पाटील,महिला पोलिस पाटील, अंमलदार उपस्थित होते.