नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या कामकाजाशी संबंधीत परिक्षण दर महिन्याला करून त्यांना बक्षीसे देण्याची योजना पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केली आहे. यात डिसेंबर महिन्याच्या कामगिरी हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा या पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. द्वितीय क्रमांक नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याला मिळाला आहे आणि तिसरा क्रमांक हिंगोली जिल्ह्यातील बासंबा या पोलीस ठाण्याला प्रप्त झाला आहे.
दरमहिन्याला पोलीस ठाण्याशी संबंधीत कामकाजाचे परिक्षण करून त्या काम काजात त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यास 3 हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यास 2 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यास 1 हजार रुपये अशी रोख बक्षीसे दिली जातात. पोलीस ठाण्याच्या कामकाजामध्ये गुन्हे निर्गती, घडलेल्या गुन्ह्यांना उघड करणे, मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाणे, अर्जचौकशी, चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, समन्स, वॉरंट बजावणी, फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींना अटक, प्रतिबंधात्मक कार्यवाही, दोषसिध्दी, सीसीटीएनएस अभिलेख, इतर अभिलेखाचे अध्यावतीकरण, अवैध व्यवसायविरोधी कार्यवाही इत्यादी बाबत परिक्षण केले जाते.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात एकूण 91 पोलीस ठाणे आहेत. ज्यात सर्वाधिक नांदेड जिल्ह्यात आहेत. डिसेंबर महिन्याच्या कामगिरीत हिंगोली जिल्ह्याच्या कुरुंदा पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला. तेथे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास निरदोडे हे कार्यरत आहेत. द्वितीय क्रमंाक नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याने पटकावला. त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने हे कार्यरत आहेत. तिसरा क्रमांक हिंगोली पोलीस ठाण्यातील बासंबा पोलीस ठाण्याला मिळाला त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास आडे हे कार्यरत आहेत. या तिघांना रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देवून पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी त्यांचा सन्मान केला. तसेच पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी जास्तीत जास्त जनताभिमुख काम करून नागरीकांच्या अधिकाधिक तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केली आहे.