*एसडीओ कार्यालयात दर शनिवारी शिबीराचे आयोजन*
नांदेड -नांदेड जिल्ह्यामध्ये जात प्रमाणपत्र निर्गतीसाठी त्यासंबंधी प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी विशेष शिबीर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन शनिवारपासून उपविभागीय कार्यालयामध्ये प्रलंबित व नव्या एकूण १२०० प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांमध्ये सर्व प्रलंबित कार्य पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले आहे.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनात या संदर्भातील नियोजन करण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत प्रलंबित सर्व जात पडताळणी प्रकरण निकाली काढण्याबाबत विशेष मोहीम राबविली जात आहे.
इज ऑफ लिविंग वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी, विविध सेवांचे सुसूत्रीकरण व सरळीकरण करण्याचे आणि समस्यांवर सोयीस्कर उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश दिले आहे.त्यानुसार या कार्यालयाने काम करणे सुरू केले आहे.
उपविभागीय कार्यालय नांदेड कार्यालयाने प्रलंबित जात प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी मागील शनिवारी व काल दि.१२ जानेवारीला दोन वेळा विशेष शिबीर घेऊन मागील शनिवारी ४०० व आज शनिवार रोजी ८०० असे एकूण १२०० जात प्रमाणपत्र निकाली काढले आहे.