नांदेड(प्रतिनिधी) : ‘ नेपथ्य म्हणजे नाटकाला आवश्यक आणि अनुरूप असणारी भौगोलिक सृष्टी उभी करणे होय.त्यासाठी आवश्यक साधने जरी तुमच्याकडे नसतील तरी जर तुम्ही सातत्याने शोधत राहिलात तर ती नक्कीच सापडतील. त्यासाठी फक्त जिद्द,परिश्रम,कल्पकता हवी ‘ असे प्रतिपादन सुप्रसिध्द आणि ज्येष्ठ नेपथ्यकार लक्ष्मण संगेवार ह्यांनी ‘ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिरात ‘ नेपथ्य : एक मुक्त संवाद ‘ ह्या विषयावर बोलताना केले.
महाप्रजापती माता गौतमी बुद्ध विहार सभागृहात १ जानेवारीपासून सुरू असलेल्या शिबिराच्या नवव्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञासूर्य प्रतिष्ठानचे सचिव बी.के.कांबळे हे होते.
प्रारंभी तेजाब पाईकराव,शेषेराव वाघमारे,वंश सोनकांबळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
त्यानंतर मुख्य संयोजक डॉ. विलासराज भद्रे ह्यांनी प्रास्ताविक केले.ह्यावेळी मार्गदर्शन करताना नेपथ्यकार लक्ष्मण संगेवार ह्यांनी अनेक रंजक उदाहरणे देत आपल्या रसाळ वाणीतून हा तांत्रिक विषय सुलभ करून सांगितला.केंद्रप्रमुख सूनंदाताई भद्रे ह्यांनी कलावंतांना शैक्षणिक दिशा देत आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आनंद कांबळे,कृष्णा गजभारे, निलाक्षी नेत्रगावकर,अरविंद गवळे, अर्णव गोल्हेरे ह्यांनी परिश्रम घेतले.