नांदेड- बोढार आणि परभणी येथील आंबेडकरी तरुणाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी. त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत , त्याला पोलीस दलातून बडतर्फ करावे आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी दिनांक 20 जानेवारी रोजी नांदेड मध्ये काढण्यात येणाऱ्या संविधान समर्थन मोर्चाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी भोकर, हिमायत नगर मध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर पालमकर , राहुल चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक पार पडली.
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची जातीयवादी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी हत्या केली आहे. याच पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी नांदेड शहरालगत असलेल्या बोंढाऱ हवेली येथील आंबेडकरी चळवळीतील उमदा तरुण अक्षय भालेराव यांच्या खुनाला पाठिंबा दिला होता . नांदेडच्या घटनेमध्ये जबाबदार असणाऱ्या पो.नी. घोरबांड यांना अटक केली असती तर आणि त्यांना सेवेतून बडतर्फ केले असते तर परभणी येथील आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेला नसता. परंतु कायद्याचे आडून दलितांची हत्या करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला राज्य सरकारने छुपा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे पाठबळ झुगारून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना मुख्य आरोपी करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार त्याच्यावरही गुन्हे दाखल करावे आणि त्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे , सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना अटक करून तो खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा या प्रमुख मागणीसाठी दिनांक 20 जानेवारी रोजी नांदेड मध्ये भव्य संविधान समर्थन महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात सहभागी होण्यासाठी भोकर, हिमायत नगर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज भोकर, हिमायत नगर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली . या बैठकीला रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पालीमकर , राहुल चिखलीकर आदींनी मार्गदर्शन केले. भोकर, हिमायत नगर मधून जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायी या नियोजित मोर्चा सहभागी होतील असा विश्वास या बैठकीत देण्यात आला.