नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत प्रसार माध्यमांचे गळे दाबण्याचे प्रकार दिल्ली ते गल्लीपर्यंत घडत आहेत. त्यात केंद्राच्या ईडी, सीबीआय सारख्या संस्था सुध्दा सहभागी झाल्या आहेत. प्रशासन ज्यांना हात लावू शकत नाही. त्यांचा हिशोब वेगवेगळ्या माफियांच्या माध्यमातून होत आहे. असाच एक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला. ज्यात एका 32 वर्षीय युवा पत्रकाराची निघृन हत्या झाली. त्याला जवळपास 20 जखमा आहेत, त्याचे हृदय कापले गेले आणि त्यानंतर त्याचे प्रेत सेफ्टीक टॅंकमध्ये टाकून त्यावरून प्लॉस्टर करण्यात आले. 3 जानेवारीला त्याचा मृतदेह सापडला आणि 6 जानेवारीला या खूनातील मास्टर माईंड छत्तीसगड पोलीसांनी हैद्राबाद (तेलंगणा) येथून अटक केला. ग्रामीण भागात पत्रकारीता करण्याची किंमत या युवकाकडून त्याचा जिव घेवून वसुल करण्यात आली. मारेकऱ्यांपैकी काही जणांनी एलीबी सुध्दा तयार केली. मारेकऱ्यांमध्ये मरणाऱ्या पत्रकाराचा एक जिवलग मित्र सुध्दा आहे. पण त्याने मित्रत्वाला मागे ठेवून बंधू प्रेमाला जास्त भाव दिल्याने पत्रकाराचा जिवघेतांना त्याला काही वाटले नाही. या संदर्भातून आम्हाला असे सुध्दा सांगायचे आहे की, इतर ठिकाणी कधी नोटीस देवून प्रसार माध्यमांना गप्प बसविण्याचा प्रयत्न होतो, कोणावर खोटे गुन्हे दाखल होतात आणि काहींना मारहाण सुध्दा होते. असाच एक पत्रकार ज्यांची स्वत:ची वृत्तवाहिनी होती त्यांना 18 वर्ष त्रास देवून सरकारने त्यांची वृत्तवाहिनी विकायला लावली आणि 18 वर्षानंतर त्यांच्या प्रकरणात कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत असे म्हणून ती संचिका बंद केली. पण या 18 वर्षांचा हिशोब कोण मागेल. तेंव्हा आम्हाला असे सुचवायचे आहे की, पत्रकारीता करतांना आपल्या जीवाचा सुध्दा धोका असतो. यासाठी पत्रकारांनी सतत चाणक्ष नजरेने आपल्या आसपासच्या परिसराला, व्यक्तींना तपासायला हवे. तरच तुम्ही सक्षमपणे पत्रकारीता करू शकणार आहात.
छत्तीसगड राज्यामध्ये विजापुर नावाचा जिल्हा आहे. या ठिकाणी मुकेश चंद्राकर हे 32 वर्षीय युवा पत्रकार कार्यरत होते. अनेक प्रसार माध्यमांमध्ये काम करून आापले कुटूंब चालविण्यासाठी आवश्यक उत्पन्न होत नव्हते. तेंव्हा त्यांनी इतरांना मदत करत आपल्या स्वत:चे युट्युब चॅनेल चालू केले जाचे आज पावणे दोन लाख सक्राईबर आहेत. चुकीच्या कामांविरुध्द बातम्या तयार करणे हाच उद्देश त्यांनी ठेवला होता. त्यांची काही उदाहरणे अशी सांगता येतील. सन 2019 मध्ये विजापुर जिल्ह्यात तयार झालेल्या एका पुलाची वाताहत एकाच वर्षात झाली. त्यानंतर चार वर्ष त्रास सहन कर ून तेथील आदिवासी जनतेने गावातील छोट-छोट्या वस्तुंचा आधार घेवून तेथे एक लाकडी पुल बनविला. त्याची एक बातमी त्यांनी केली होती. त्याच जिल्ह्यामध्ये 50 कोटीच्या रस्त्याचे टेंडर सुरेश चंद्राकर याला भेटले. पुढे ते 110 कोटीचे झाले. त्या रस्त्यावर पायी चालतांना त्यातील वाळू, गिट्टी आपल्या पायाने पुढे सरकत होती. म्हणजे सिमेंटचा तर पत्ताच नव्हता. मरणारा चंद्राकर आणि मारणारा चंद्राकर म्हणजे नक्कीच ते भावकीतील आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुरेश चंद्राकर काही वर्षांपुर्वी 1500 रुपयांची नोकरी करणारा व्यक्ती होता. 110 कोटींचा रस्ता बनवितांना बहुदा सुरेश चंद्राकरने विचार केला असेल की, या भागात आदीवासी लोक राहतात. यांच्याकडे चार चाकी तर सोडाच, दुचाकी किंवा सायकल सुध्दा उपलब्ध नाही. म्हणून मी जो रस्ता तयार करतो आहे तो त्यांच्यासाठी अप्रतिम आहे. कारण 1500 रुपयांची नोकरी करणारा हा चंद्राकर काही दिवसांत एवढा प्रसिध्द झाला की, आपल्या लग्नाची वरात त्याने हेलिकॉप्टरमधून नेली होती. त्याचाही मिडीयाने गवगवा केला होता आणि माझी ही सर्व माहिती मिडीयाला मुकेश चंद्राकरने पुरवली असा त्याचा समज होता.
दि.1 जानेवारी 2025 रोजी मुकेश चंद्राकरला सुरेश चंद्राकरच्या हस्तकांनी एका खेळण्याच्या मैदानावर बोलावले आणि तो गायब झाला. 3 जानेवारी रोजी त्याचे प्रेत सेफ्टीक टॅंकमध्ये सापडले. त्याच्या जखमांचे विश्लेषण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असे केले आहे की, त्याच्या 15 अस्थी तोडण्यात आल्या होत्या. त्याच्या शरिरावर इतर ठिकाणी अनेक जखमा होत्या. त्याच्या मानेचे हाड तुटलेले होते, त्याच्या कंबरेचे हाड तुटले होते. एवढेच नव्हे तर त्याच्या हृदयाचे सुध्दा दोन भाग झाले होते. यावरुन त्याची हत्या किती निघृण होती, अमानवीय, कायद्याच्या भाषेतील रेअरेस्ट ऑफ रेअर या शब्दात बसणारी आहे. त्याची हत्या करून त्याला सेफ्टीक टॅंकमध्ये टाकले हा तर त्यापेक्षा वाईट प्रकार आहे. आता गुन्हा दाखल झाला आहे. अनेक आरोपींना अटक झाली आहे. पण यातील सुरेश चंद्राकरला हैद्राबाद येथून अटक झाली. तसेच 1 जानेवारी रोजी तो विजापुर जिल्ह्यात नसून जगदलपूर जिल्ह्यात आहे असे त्याचे मोबाईल लोकेशन सांगते. सुरेश चंद्राकरचा एक भाऊ पत्रकार मुकेश चंद्राकरचा जिवलग मित्र होता. पण त्याने हत्या करतांना आपल्या मित्राला मानवीय दृष्टीकोणातून पाहिले नाही अशी झाली आहे पत्रकारीतेची अवस्था. छत्तीसगड राज्यात झालेला हा पत्रकाराचा खून देशासाठी कलंक आहे.
दिल्ली ते गल्लीपर्यंत पत्रकारांशी बोबडीवळविण्यासाठी भरपूर काही कार्यक्रम आज सुरू आहेत. भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारीता असे म्हणण्याची वेळ समाप्त झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांना जास्त सजग राहण्याची गरज आहे. पत्रकारांवर विविध प्रकारचे होणारे आरोप जसे खंडणी, पित्त पत्रकारीता, खाणे-पिणे मागण्याची सवय याला सुध्दा आपण सर्व पत्रकारांनी दुर राहायला हवे. तरच आपल्या अस्तित्वाला धोका होणार नाही. कारण असे सांगितले जाते की, तुमच्या समोर बोलले जाते ती तुमची प्रशंसा असते आणि तुमच्या माघारी बोलले जाते ते तुमचे व्यक्तीमत्व असते. मुकेश चंद्राकारसारखच एक प्रकार आम्ही दुसरा उपस्थित करू इच्छितो. एनडीटीव्हीचे मालक डॉ.प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय या होत्या. त्यांच्याविरुध्द कोणत्या तरी बॅंकेचे 42 कोटी रुपये भरले नाही असा आरोप करून त्यांच्या अनंत चौकशा झाल्या, यात त्यांना अटक मात्र झाली नाही. पण त्यांच्या मागे लावलेले भवऱ्यांचे जाळे एवढे मोठे होते की, त्यांनी अखेर आपली एनडीटीव्ही ही वृत्त वाहिनी गौतम अदानीला विकली. आपल्या जीवनाचा शेवटच्या काळात झालेला सत्यानाश सहन करून आजही ते जगत आहेत. त्यांना 18 वर्ष झालेल्या त्रासानंतर सीबीआयने त्यांच्याविरुध्द सक्षम, सुदृढ पुरावे उपलब्ध नाहीत. या आधारावर त्यांचा खटला समाप्त केला. पण डॉ.प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्या हरवलेल्या 18 वर्षांचे काय? याचे उत्तर कोणीच देवू शकत नाही.
तशाच प्रकारे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पत्रकारांविरुध्द खलबते चालूच असतात. कोठे-कोणाला नोटीस दिली जाते. कोठे कोणाला अवैध धंद्यांची जागा विचारली जाते. म्हणजेच पत्रकारांच्या लेखणीला बोथट करण्याचाच हा प्रकार आहे. काही महाभाग तर असे आहेत की, पत्रकारांच्या कुटूंबावर सुध्दा चुकीचे आणि खोटे आरोप करून त्यांना पोखरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस मात्र काही पत्रकारांची सहनशिलता समाप्त होते आणि ते स्वत:च आपल्या लेखणीला आपल्या हाताने बोथट करून कचरा कुंडीमध्ये फेकून देतात. अशा परिस्थितीत आमची विनंती आहे की, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्याला स्वत:लाच मेहनत करायची आहे आणि त्या मेहनतीसाठी कधीच पाऊल मागे घेवू नका कारण आजपर्यंतचा ईतिहास आहे की, सत्याचाच विजय होत असतो. मुकेश चंद्राकरच्या आई आणि भाऊ यांना झालेल्या दु:खात वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा आपल्या संवेदना व्यक्त करत आहे.