दर्पण दिनाच्या निमित्ताने शुभकामना देतांना आम्ही आमच्या सहकारी पत्रकारांना पत्रकारीतेतील काही तथ्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्यांना आवडीतील त्यांनी घ्यावे नसता आमच्या शब्दांना विसरून जावे. एखादी घटना घडल्यानंतर त्यातील नाविण्य, जनतेची रुची, जनतेची त्या घटनेशी जवळीकता, जनतेवर पडणारा प्रभाव अशा तत्वांना महत्व देणे महत्वाचे आहे. पण आज थोडासा बदल झाला आहे. त्यात पत्रकारांची वागणूक, त्यांनी केलेल्या बातम्या यांना बुध्दी नसलेले लोक पित पत्रकारीता असे म्हणतात. काही जण पाकिट पत्रकारीता करतात, काही जण सत्तेला आवडेल तेच लिहितात. पण खरे तर सत्ताधाऱ्यांना जे आवडत नाही ते लिहिणेच खरी पत्रकारीता आहे. या सर्व पत्रकारीतेच्या प्र्रवासात काही जण गडगंज श्रीमंत झाले, काही जणांना जेलची हवा पाहावी लागली. काही जण देशोधडीला लागले. पण आपले व्रत, आपला उद्देश, आपण उचललेला विडा ज्यांनी सोडला नाही ते आजही ताठ मानेने उभे आहेत. गांधीजी सांगत होते, ते तुम्हाला अगोदर बोलतील, तुम्हाला खाली पाडतील, तुमची बेअब्रु करतील. पण अखेर विजय तुमचाच होईल. अशाच प्रकारे सत्यावर चालणाऱ्या पत्रकारांचा नेहमीच विजय होतो. त्यात चिंता करण्यासारखे काही नाही. पण आपल्या हातून असे काही घडू नये ज्यामुळे इतर लोक आपल्याकडे बोट दाखवतील ही जबाबदारी मात्र आपलीच अर्थात पत्रकारांची आहे.
पत्रकारीतेत संपादकीय, फोटो पत्रकारीता, कार्टून, रेखांकन आणि कार्टोग्राफी असे विविध आयाम आहेत. तसेच शोध पत्रकारीता, विशेष पत्रकारीता, वॉच डॉग पत्रकारीता, ऍडव्होकेसी पत्रकारीता, वैकल्पीक पत्रकारीता असे वेगवेगळे प्रकार आहेत. या सर्व प्रकारांना एकत्रितपणे करता येणारा योध्दा महान ठरतो. असा योध्दा आम्हाला जो माहित आहे तो म्हणजे नगेंद्रनाथ गुप्त हे बिहारचे रहिवासी होते. त्यांनी बातमी लिहितांना त्या व्यक्तीचा चेहरा, नाक, डोळे, जात अशा प्रकारे लिहित होते की, वाचतांना तो माणुस आपल्यासमोरच उभा आहे असे दिसत होते. 1878 मध्ये ते कोलकत्ता येथे आले. त्यावेळी वर्नाकुलर प्रेस ऍक्ट प्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही झाली होती. कारण त्यांनी त्यावेळी सरकारच्या बुटाखालची पत्रकारीता केली नव्हती. ते म्हणायचे तर्क आणि तथ्य बातमी लिहितांना आवश्यक असतात. आजच्या परिस्थितीत तर्काच्या बातमीला पित पत्रकारीता म्हटले जात आहे. असो प्रत्येकाची विचार श्रेणी वेगळी आहे. त्या प्रमाणे ते काम करत असतात. पण आपण लिहित असतांना त्या घटनेशी ज्या व्यक्तींचा संबंध असतो त्यांना राग येणारच असतो. पण आमची जबाबदारी ही आहे की, ती घटना लिहुन सत्ताधाऱ्यांच्या समक्ष एक स्वत: अवलोकनाचा विषय उभा करणे आवश्यक आहे.
पत्रकारीतेत सर्वात महत्वाचा स्त्रोत आहे. हा स्त्रोत मिळवतांना सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की, आपल्या बातमीचे वजन राहिले पाहिजे. काही छोट्या-छोट्या गोष्टीपण असतात. त्यात स्त्रोतांचा उल्लेख करण्याची गरजपण नसते. तरी पण सत्ताधारी स्त्रोत विचारायला सुरू करतात. आजच्या परिस्थितीत सुरू असलेल्या पत्रकारीतेत घटना लिहितांना फक्त स्त्रोत लिहिला जातो. तो काय आहे, तो कसा आहे, याचे वर्णन केले जात नाही. जुन्या काळाच्या दृष्टीकोणातून आज भारतीय संविधानाने घटनेतील परिच्छेद क्रमांक 19(1)(अ) नुसार पत्रकारांना बरेच अधिकार दिले आहेत. पण या अधिकारातून आम्ही कोणाच्या गळ्यावर तलवार तर चालवत नाही ना. याचा विचार आपण करण्याची गरज आहे. प्रसिध्द गितकार जगदीश खेबुडकर यांना आम्ही भेटलो होतो तेंव्हा त्यांनी आमच्या दैनंदिनीवर एक वाक्य लिहिले होते, “पत्रकाराची लेखणी दुधारी, लागु नये कोणाच्या जिव्हारी’ या शब्दाप्रमाणे आम्ही नेहमीच जगदीश खेबुडकरांच्या या वाक्याचा सन्मान करून वाक्य लिहित असतो. पण काही जणांना अंगावर घेण्याची सवय असते. तसे आमच्यासोबत होतच आले आहे. त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही लिहिलेला विषय म्हणजे माध्यमातून संदेश देण्याचा असतो. त्यापेक्षा वेगळा कधीच नव्हता आणि पुढे सुध्दा आम्ही त्या उद्देशाला वेगळे वळण लागू देणार नाही. बऱ्याच वेळेस स्त्रोताचा आधार असतो. पण बऱ्याच वेळेस आधार नसतो. शब्द असतात. शब्द सुध्दा विषारी असू शकतात. परंतू त्यांचा वापर करतांना आम्ही नेहमतीच दक्षता बाळगली आहे. अनेकदा पत्रकार घटनास्थळी उपस्थित नसतो. म्हणजे घटनेचा स्त्रोत तो पत्रकार होवूच शकत नाही. तेथे हजर असलेल्या लोकांच्या सांगण्यावरून या बातम्यांना तो प्रसारीत करतो. पण ते सांगणारी मंडळी त्याच्या विश्र्वासाची नक्कीच असते.
आपण लिहिलेल्या बातमीमुळे भविष्यात त्या बातमीचा परिणाम समाजावर कसा होणार आहे. याचा विचार करून सुध्दा त्या बातमीच्या शब्दांना रंग भरले पाहिजेत. नाही तर भविष्यात होणाऱ्या उद्रेकाचे जबाबदार आपण स्वत: ठरतो. आमच्या जीवनातील एक प्रसंग मांडायची इच्छा आहे. नांदेड शहरात एका सणाच्या पहिल्या रात्री काही जणांनी एका विशिष्ट समाजाचे लोक वापरतात तशाच टोप्या वापरून तो खून केला होता. या संदर्भाने आमच्या लिखाणामध्ये विशिष्ट टोप्यांचा उल्लेख आम्ही केला होता. परंतू दोन ते तीन तासानंतर तक्रार दाखल झाली. त्यात जी नावे फिर्यादीने लिहिली होती. त्यातील एकही व्यक्ती त्या टोप्या वापरणाऱ्या समाजाचा नव्हता. आमच्या काही चेल्यांनी तुमच्यात तर हिम्मत आहे मग त्या समाजाचे नाव का लिहिले नाही असा प्रश्न आम्हाला विचारला होता. तेंव्हा आम्ही एका वाक्यात उत्तर दिले होते की, माझ्या शहरात मला आग लावायची नाही. त्या काळी असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा आमची प्रशंसा केली होती. पण यात गुन्हा दाखल होण्याअगोदर बातमी कशी लिहिली असेही प्रश्न आम्हाला त्यावेळी विचारण्यात आले होते. पण सध्या स्पर्धेच्या युगात आमचा नंबर दुसरा लागावा असे आम्हाला वाटत नव्हते म्हणून आमच्या स्त्रोतांना तपासून, त्यांना क्रोस चेक करून आम्ही ती बातमी त्यावेळी लिहिली होती. त्या बातमीचे वाचक एकूण 2 लाखांपेक्षा जास्त झाले होते. काही तासातच ती बातमी 50 हजारांच्या आकड्यापर्यंत पोहचली होती. आमचा स्त्रोतही चुकला नाही आणि आम्ही आपल्या शहरात आपल्या शब्दाने आग लावली नाही याचा आनंद आज सुध्दा आम्हाला होतो. एकंदरीतच पत्रकारीता करतांना मी कोणाकडे एक बोट दाखवत आहे तर इतर चार बोटे माझ्याकडे आहेत याचे नेहमीच लक्ष ठेवतो.