नांदेड – नांदेड शहरालगत असलेल्या बोंढार आणि परभणीतील आंबेडकरी चळवळतील युवकांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात यावी . त्याच्या विरोधात खुनाच्या खटल्यासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसारही गुन्हे दाखल करावेत या मागणीसह राज्यात होत असलेल्या दलितांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ 20 जानेवारी रोजी नांदेडमध्ये संविधान समर्थन समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेतून प्रा. राजू सोनसळे , डॉ. राजेश्वर पालमकर केशव मुद्देवाड यांनी संयुक्तरीत्या दिली.
शहरालगत असलेल्या बोंढाऱ येथे अक्षय भालेराव या युवकाची जातियवादी लोकांनी अत्यंत क्रूरतीने हत्या केली. या हत्येचा खरा सूत्रधार पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड असून त्यांनीच मारेकऱ्यांना फुस दिली होती . मारेकऱ्यांना बळ दिले होते. घोरबांड या प्रकरणात आरोपी असतानाही सरकारने त्याला पाठीशी घातले . त्यानंतर घोरबांडची परभणीत बदली झाल्यानंतर परभणीतही त्यांनी जातीवादी भूमिका घेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या केली. खर तर घोरबांड हे आंबेडकरी चळवळीचे आणि दलितांचे मारेकरी आहेत . बोंढार प्रकरणात त्यांना सेवेतून बडतर्फ केले असते तर परभणीची घटना घडलीच नसती असा आरोपही यावेळी पत्रकार परिषदेतून करण्यात आला .
राज्यातील अनेक भागांमध्ये आंबेडकरी चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. याला राज्य सरकारची फूस आहे . गृहमंत्रालय आणि गृह विभाग जाणीवपूर्वक आंबेडकरी आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांना मोठ्या प्रमाणात अमानुष मारहाण करीत आहे . परभणीत निर्दोष महिला , मुलींना पोलिसानी बेदम मारहाण केली . आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वाहनांची प्रचंड नासधुस केली . हा हिटलरी नंगानाच सुरू असतानाही राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशोक घोरबांड यांना केवळ निलंबित करून प्रकरण मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत .परंतु आंबेडकरी चळवळ असे होऊ देणार नाही . त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना बोंढार आणि परभणीतील युवकांच्या मृत्यूप्रकरणी सह आरोपी करून त्यांच्याविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हे दाखल करावेत . ॲट्रॉसिटी ॲक्टनुसारही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा . त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे . याचवेळी परभणीतील पोलीस निरीक्षक मरे यांनाही सह आरोपी करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी या व अन्य मागण्यासाठी दिनांक 20 जानेवारी रोजी नांदेडमध्ये महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी केशव मुद्देवाड , राजेश्वर पालमकर , प्रा. डॉ. प्रकाश मोगले , दिलीप जोंधळे , डॉ. श्रावण रॅपनवाड , नंदन नागरे , प्रतीक मोरे , शैलेश लवटे , डॉ. गौतम कापुरे आदींची उपस्थिती होती.