काय आहे पत्रकारीता यावर विचार करू तेंव्हा कोणतीही माहिती आपल्याला त्या घटनेकडे नेते. आपल्या आसपास, आपल्या शहरात, राज्यात आणि देशविदेशाबाबत माहिती मिळवणे ही पत्रकारीता आहे. आमच्या बातम्या दैनिक जीवनामध्ये प्रभाव आणतात. आमच्याच नव्हे तर समाजावर सुध्दा त्या प्रभाव पाडतात. बहुतांश माहिती आम्हाला माध्यमांकडून मिळते. आमच्या दुरची माहिती आम्हाला वृत्तमान पत्रातून आणि आजच्या युगात टेलिव्हीजनच्या माध्यमाने प्राप्त होते. पुर्वी टेलिव्हीजनची जागा रेडीओकडे होती. आता तर इंटरनेटवर सुध्दा बातम्या पाहायला मिळतात. या सर्व मिळणाऱ्या माहितीला संकलीत करून त्याचे रुपांतर आपण बातमीत करतो आणि आपल्या वर्तमान पत्राच्या किंवा प्रसार माध्यमाच्या प्रारुपप्रमाणे तिला तयार करून जनतेसाठी पाठवितो तीच पत्रकारीता म्हटले जाते.
बातमी तयार करतांना प्रेरक आणि उत्तेजित करणारी बातमी असा एक विषय होतो. वेळेवर दिली जाणारी माहिती आपल्यासाठी बातमी होते. एखादी घटना घडली तर त्याचा संपुर्ण अहवाल छापणे ही सुध्दा एक बातमी आहे. बातमी म्हणजे काय? अत्यंत जलदगतीने लिहिलेला ईतिहास. आपल्याला मिळणारी प्रत्येक सुचना बातमी होवू शकत नाही. तशा बातम्या प्रसारीत करू सुध्दा नाही. ज्यामध्ये भ्रष्टाचार संम्मेलित आहे. आम्हाला आमचा स्त्रोत सांगतो की, अमुक व्यक्तीने तमुक व्यक्तीकडून पैसे घेतले. त्या पैशांची संख्या सुध्दा सांगतो. परंतू तसे प्रकाशित केल्यानंतर आपल्यावर भारतीय दंड संहितेेतील 499 आणि 500 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल होतो. त्यासाठी एखादा ऑडीओ, व्हिडीओ, लेखी स्वरुपाचे शब्द उपलब्ध झाले तरच ते लिहावे. आज काल तर अनेक पत्रकारांकडे छुपे कॅमेरे सुध्दा आहेत. त्यामुळे या सुचना सुध्दा आम्हाला प्राप्त होवू शकतात. पण त्यानंतर तयार होणाऱ्या प्रसंगांना आम्हाला सुध्दा सामोरे जावे लागते. त्यासाठी तयारी ठेवूनच अशा संदर्भाना, माहितीला बातमी करा. आमच्या जीवनात आलेल्या एका प्रसंगाप्रमाणे आम्ही एका व्यक्तीबद्दल भ्रष्टाचाराची माहिती त्याच्याविरुध्द दाखल झालेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गुन्ह्यानंतर प्रसिध्द करतांना त्याला जुन्या ईतिहासाचे संदर्भ दिले. त्यावेळेस त्या व्यक्तीचा बंधू आम्हाला म्हणाला की, माझा एकच भाऊ जगात भ्रष्टाचार करतो काय? त्याच्या बोलण्याची जवळपास 45 मिनिटाची रेकॉर्डींग आजही आमच्याकडे उपलब्ध आहे. पण आम्ही आज हा विषय मांडतांना कोणाचीही बदनामी करण्याच उद्देश ठेवलेला नाही. परंतू हे सांगण्यासाठी हा विषय लिहिला आहे की, त्या भावाने आमच्यासमोर माझा भाऊ भ्रष्टाचारी आहे हे मान्यच केलेले आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही लिहिले होते. तो आजही रस्त्यावरून जातांना-येतांना सुध्दा आमच्याकडे नेहमी डोळे वटारूनच पाहत आहे. काय अर्थ घ्यावा आणि काय त्याला विचारावे आम्ही लिहिलेले आहे हे सत्यच होते. त्याच्या बंधूने आमच्यासोबत बोलतांना मान्य पण केले. तरी पण डोळे वटारण्याची परिस्थिती म्हणजे चोर तर चोर आणि पुन्हा शिरजोर अशा परिस्थितीत सुध्दा आपल्या जीवनाला चालवावे लागते.
आमच्या एका लाडक्या लेकराने रात्रीच्या अंधारात दोन माणसे बोलतांना ऐकले त्यात ते दोघे आम्हाला आणि आमच्या दुसऱ्या लेकराला गोळी मारण्याची चर्चा करत होते. ऐकणाऱ्या लेकराने त्यांना विचारले दोघांपैकी कोणाला बोलावू येथेच गोळी मारा. त्यावेळी झालेल्या गर्मागरम चर्चेनंतर ते दोघे पळून गेले. पण दुसऱ्या दिवशी त्या दोघांपैकी एकाला पश्चाताप झाला आणि त्याने आमच्याशी संपर्क साधून क्षमा याचना केली आणि त्याची याचना आम्ही पुर्णपण केली. यात आम्हाला नवीन खुलासा समोर आला की, आम्ही लिहिलेल्या बातम्यांचा तो परिणाम होता. त्या बातम्या सुध्दा भ्रष्टाचाराशी संबंधीत होत्या. पण आमच्यावर 499 व 500 प्रमाणे गुन्हा दाखल होणार नाही याची दक्षता आम्ही बातमी लिहितांनाच घेतली होती. आजही त्या व्यक्तीकडे तेच काम आहे. पण करणार काय ? लेखणी झिजवून सत्य मांडण्याचे ध्येय आमचे आजही कायम आहे. संधी मिळाली तेंव्हा त्या व्यक्तीची सत्यता आजही आम्ही मांडतच आहोत. ज्या दिवशी परिणाम व्हायचा असेल त्या दिवशी तो नक्कीच होईल असा आमचा विश्र्वास आहे.
पत्रकारीता आणि त्याचा स्त्रोत यांच्यातील आपसातले संबंध पत्रकारीतेचे स्वरुप निर्धारीत करतात. बातम्यांसाठी विविध आणि अनेक प्रकारचे स्त्रोत असतात. पण सध्या विविधतेवर अनेक प्रश्न उपस्थित होते आहेत. काही संशोधकांनी यावर इशारा करतांना आता मिडीयाच्या विविधतेमध्ये कमतरता आली आहे असाही आरोप केला आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, बनवलेले स्त्रोत आणि त्यांनी तयार केलेली माहिती यावर पत्रकारीता निर्भर झाली आहे. याचे उदाहरण सांगतांना इरान-इराक युध्द कव्हर करणाऱ्या पश्चिम देशातील पत्रकारांनी अमेरिकाच बरोबर आहे असे सांगितले आणि मिळालेली माहिती अमेरीकी सैन्याकडून मिळाली असे वृत्त लिहिले. पण ते पत्रकार अमेरिकी सैन्यासोबत जुडलेलेच होते. त्यामुळे त्या युध्दाचे सत्य आणि वस्तुनिष्ठ तसेच संतुलित रिपोर्टींग झाली नाही. कारण त्यांचा एकच स्त्रोत होता आणि ते म्हणजे अमेरिकन सैन्य म्हणूनच स्त्रोतांची कमतरता त्या युध्दाचे खरे चित्र जनतेसमोर आले नाही. पत्रकारीता कधीच सत्य आणि असत्य, अन्याय आणि न्याय या विषयांच्या मध्ये तटस्थ राहु शकत नाही. कारण लिहितांना स्वत:ला निष्पक्ष म्हणत असतांना खरे आणि न्यायासोबत असते. चुकीचे किंवा अन्यायासोबत नसते. पत्रकार हा घटनेचा मित्र असतो. पण समाजात वावरतांना त्याच्यावर झालेला प्रभाव, त्याच्या गुरूने दिलेले शिक्षण आणि त्याला मिळालेला जगातील प्रतिसाद सुध्दा त्याच्या बातमीत येत असतो हे खरे आहे.