नांदेड, – ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे व ते न्यायापासून वंचित राहू नये याकरिता नांदेड जिल्हामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत सोमवार 6 ते शुक्रवार 24 जानेवारी 2025 पर्यंत मोबाईल व्हॅनमधून फिरते लोकअदालत जिल्ह्यातील निवडक गावापर्यंत पोहोचणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय नांदेड येथून सोमवार 6 जानेवारी रोजी मोबाईल व्हॅनच्या प्रवास कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
त्यानंतर त्याच दिवशी लोहा तालुक्यातील मौजे सुनेगाव व पुढे 7 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील पेठवडज, 8 जानेवारी रोजी मुखेड तालुक्यातील पांडुरणी, 9 जानेवारी रोजी देगलूर तालुक्यातील करडखेड, 10 जानेवारी रोजी नायगाव तालुक्यातील मांजरम, 13 जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील आटकळी, 14 जानेवारी रोजी धर्माबाद तालुक्यातील येवती, 15 जानेवारी रोजी उमरी तालुक्यातील सोमठाणा, 16 जानेवारी रोजी मुदखेड तालुक्यातील बारड, 17 जानेवारी रोजी अर्धापूर भोगाव, 18 जानेवारी रोजी हदगाव तालुक्यातील तामसा, 20 जानेवारी रोजी माहूर तालुक्यातील सारखनी, 21 जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील इस्लापुर, 22 जानेवारी रोजी हिमायतनगर तालुक्यातील सरसम, 23 जानेवारी रोजी भोकर तालुकयातील मोघाळी येथे पोहोचणार आहे. तर नांदेड तालुक्यांतर्गत ग्रामपंचायत धनेगाव येथे 24 जानेवारी 2025 रोजी पोहोचणार आहे.
या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील वादपुर्व प्रकरणे, संबंधीत पोलीस स्टेशन हद्यीतील प्रलंबित दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे तसेच गुन्हा कबुलीची प्रकरणे याठिकाणी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ‘न्याय आपल्या दारी’ या फिरत्या लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश मो. युनुस अब्दुल करीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वरील नमुद दिवशी प्रत्येक गावामध्ये सकाळी 11 वा. पासून फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून कायदेविषयक शिबिरादरम्यान विविध कायद्यांचे मार्गदर्शन होणार आहे. यासंधीचा लाभ सर्व ग्रामस्थ, नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.