नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीसांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अवैधरित्या होणारी गोवंश वाहतुक पकडून त्यातील 36 गोवंशांना गोशाळेत पाठविले आहे. तसेच दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरिक्षक अमोल हरीदास भगत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिमायतनगर पोलीसांनी 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजेच्यासुमारास हिमायतनगरमधील मिलाप फंक्शन हॉलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत बांधलेले 36 गोवंश मुक्त केले. या गोवंशांची किंमत 2 लाख 76 हजार रुपये आहे. हे सर्व गोवंश दोन चार चाकी गाड्यांमध्ये वाहतुक करण्यात येत होते. त्या गाड्यांची किंमत 13 लाख रुपये आहे असा एकूण 15 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक अमोल भगत यांच्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात शेख जुनेद शेख उस्मान (31) रा.मुर्तूजा कॉलनी हिमायतनगर आणि त्याचा एक 22 वर्षीय साथीदार अशा दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 1/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता, प्राण्यांच्या निर्दयीपणासाठी असणारे कलमे आणि प्राण्यांच्या वाहतुकीची कलमे जोडण्यात आली आहेत. ही सर्व 36 गोवंशे गोशाळेच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. पोलीसांनी छापा टाकला तेंव्हा गुन्ह्यातील दोन्ही आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, भोकरच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक शफाकत आमना यांनी हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक अमोल भगत, पोलीस अंमलदार नागरगोजे, पाटील, अऊलवार आणि चौदंते यांचे कौतुक केले आहे.