नांदेड :- ‘विद्यापीठ वाचत आहे’ हा उपक्रम ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत आपण राबवत आहोत. जीवनात बाराखडी शिकल्यापासून ते मरेपर्यंत आपण वाचत असतो. इंटरनेटमुळे पुस्तके वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढविणे महत्त्वाचे आहे. वाचल्याशिवाय कोणीही मोठे होणार नाही, वाचन संस्कृतीच माणसाला मोठी करते. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते दि. २ जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सिंकू कुमार सिंह, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी, प्रा. डॉ. पी. विठ्ठल जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी महापालिकेचे सहायक ग्रंथपाल श्रीनिवस इज्जपवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत म्हणाले, लिपीच्या शोधामुळे वाचन शक्य झाले आहे. लिहिण्या- वाचण्यामुळेच ज्ञानाचा प्रसार झाला आहे. वाचन तर आपण रोज करतो पण स्वतःला घडविण्यासाठी जे वाचन करतो ते खरे पुस्तक आहे. पुस्तक हा माणुसकीचा आरसा आहे. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळेपर्यंत नेण्याचा मानस आहे. अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. विठ्ठल यांनी केले तर आभार ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले. यावेळी विद्यापीठातील सर्व संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.