भारताचे बुद्धीवान अर्थ तज्ञ, भारताचे अर्थ मंत्री, भारताचे दोन टर्म प्रधानमंत्री असलेले डाॅ. मनमोहन सिंघजी, माफ करा आम्हाला…! आम्ही आज तुमचा अपमान केला आहे. तुमच्या जीवंतपणी केला आणि आता तुमच्या मृत्यूनंतरही आम्ही तुमचा अपमानच करीत आहोत ! तेंव्हाही तुम्ही शांत होतात आणि आजही शांतपणे चितेवर जळत होतात. आम्ही मात्र शैतानी सुखाचा असूरी आनंद घेत होतोत, कसे जिरवली काँग्रेसची असे म्हणून आम्हीच आमची पाठ थोपटून घेत होतोत.
मौन मोहन, मुके मनमोहन, रिमोटवर चालणारे सरदार, रेनकोट घालून अंघोळ करणारे प्रधानमंत्री असल्या सडकछाप टिकेने तुम्ही तेंव्हा कधीही डगमगला नाहीत. कुणावर कसल्या नीच भाषेत पलटवार केला नाहित. आपण आपली वाटचाल शांत व संयतपणे चालू ठेवली होती !
स्वतः संघाच्या रिमोटवर चालणारे आजचे बोलघेवडे बोलबच्चन नीच प्रवृतीचे लोक तुम्हाला रिमोटवर चालणारे प्रधानमंत्री असे म्हणायचे पण तुम्ही कुणावरही चिडला नाहित, कुणावरही तुटून पडला नाहित. आक्रस्ताळेपणा केला नाही. आपण आपले देशहिताचे कर्तव्य पार पाडीत राहिलात ! हे आमच्या सदैव लक्षात राहील.
मनमोहन जी, तुमच्या डोक्यावर सदैव असलेली निळी पगडी सदैव आमच्या आठवणीत राहील. तुमच्या डोळ्यात असलेली तथागताची करुणा ही सदैव स्मरणात राहिल. तुम्ही एक सच्चे शिख होतात. शिख धर्माच्या परमोच्च तत्वज्ञानाचे आपल्या जीवनात तंतोतंत पालन करीत असतांना कोणत्याही हिंदूंचा/ कोणत्याही मुसलमानांचा/ जैन किंवा बौद्धांचा अपमान करण्याचा, बटेंगे तो कटेंगे असे म्हणून मतांसाठी विशिष्ट जाती धर्माचा अवमान करण्याचा हलकटपणा आपण कधीही केला नाहित, म्हणून तुम्ही ग्रेट आहात !
तुमचे जन्मस्थळ फाळणीमुळे पाकिस्तानमध्ये गेले पण तुम्ही पाकिस्तानात रमला नाहित. अखंड भारताचे स्वप्न उराशी बाळगून गाव सोडले, मित्र आणि कुटुंबातील लोक हरवले. रक्तपात काय असतो हे उघड्या डोळ्यांनी पाहिले तरीही सूड भावना न दाखवता आयुष्यभर काम करत राहिलात हे सदैव लक्षात राहिल. भारतातील सर्व जातीधर्माचे प्रतिनिधी बनून सर्वांना समान न्याय देत राहिलात. देशाच्या प्रगतीचा सतत ध्यास घेत राहिलात !
एक कुशल प्रधानमंत्री म्हणून तुम्ही जगातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी केलेली सदैव लक्षात राहील. शेतकरी विरोधी वर्तन करुन, शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करुन, शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकून, शेतकरी आंदोलने चिरडून टाकून आज मसिहा बनलेले, फक्त कांही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर टाकून देश चालवितो म्हणणारे, ते दुरुनच मन की बात करतात पण त्यांची नियत जनता जाणून आहे.
तुमचा मुक्त अर्थव्यवस्थेचा निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरला आहे. मुक्त अर्थव्यवस्था स्विकारताना भारतातील गोरगरीब व मागासवर्गीय जनतेचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपण झटलात हे सदैव लक्षात राहील. क्रुड तेलाच्या किंमती जगभरात भडकल्या होत्या तरीही पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ न करता पेट्रोलची किंमत ७० रुपयेच ठेवली हे देखिल सदैव लक्षात राहील. २००८/०९ सालात जागतिक मंदीची झळ आपण भारताला बसू दिली नाही.
तुम्ही स्वतः कोणताही निर्णय घेत नाही अशी तुमची मुद्दाम बदनामी करण्यात आली, संघीय व गोदी मिडियाने तुम्हाला न्याय दिला नाही, त्या मिडियावर तुम्ही कधी आगपाखड केली नाही. इतिहास मला न्याय देईल एवढेच तुम्ही बोललात. तो इतिहास लिहायची वेळ आली आहे. तुमच्या काळात तुम्ही दिलेल्या RTE, RTI, GST, मनरेगा, आधारकार्ड, डिजीटल इंडिया, स्किल इंडिया, निर्मल ग्राम, आरोग्य योजना तुमच्या स्वतंत्र बुद्धीमत्तेची साक्ष देत राहतील.
तुम्ही दिलेला अन्न सुरक्षा कायदा कधीही विसरता न येण्यासारखा आहे. अडाणी अनपढ ढोंगी नाटकी राजकीय लोकांनी तुमच्यावर चिखलफेक केली तरीही तुम्ही शांत राहून देशहिताचे काम करत राहिलात. कुणी निंदा अथवा वंदा देशहित हाच माझा छंद असे समजून तुम्ही कर्तव्य बजावत राहिलात.
भारतीय अर्थव्यवस्थेला तुम्ही बुस्टर डोस दिलात. एकेकाळी भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता तेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या प्रचंड ज्ञानाचा वापर करुन भारताला उभारी दिली, हे कसे विसरता येईल ?
पत्रकार आणि संसदेतील डिबेटला आपण कधी घाबरला नाहित. प्रधानमंत्री कार्यकाळात आपण तब्बल १११ पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिलात. विशिष्ट मित्रांसाठी फक्त पदाचा गैरवापर करीत हुकूमशहासारखे कधीही वागला नाहीत व देश विकायला काढला नाहित.
आज तुम्हाला भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत असतांना आपण एक हिरा गमावल्याचे दुःख होत आहे पण तुम्ही काँग्रेसचे म्हणून केवळ टिकेसाठी टिका करणारे बदमाश राजकारणी किती कमी उंचीचे आहेत याची जाणिव होते. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेऊन इतिहास लिहिला तर तुम्ही देशासाठी जगलात आणि देशासाठी मेलात असेच लिहावे लागेल पण त्या गोडबोल्यांनी तुमच्या पद व प्रतिष्ठेची गरिमा ठेवली नाही. पारंपारिक प्रोटोकाॅल पाळला नाही.
अटलबिहारी वाजपेयीसाठी एक न्याय आणि शिख आहात म्हणून कमी समजून तुमच्यासाठी दुसरा न्याय ! न्याय कसला हा तर सरळ सरळ अन्याय आहे. यालाच म्हणतात संघाचा विषारी जातीयवाद ! दहा वर्ष प्रधानमंत्री असलेल्या महान व्यक्तीचा मेल्यानंतर राजघाटावर अंत्यविधी करु न देणे ही किती संकुचित व नीच मानसिकता आहे या भपकेबाज शेठची !! धिक्कार असो अशा या सडक्या मानसिकतेचा !!!
राजघाटावर शेकडो एकर जागा आहे जिथे प्रधानमंत्री व अन्य मान्यवर व्यक्तींचा अंत्यविधी होतो आणि नंतर तिथेच त्यांचे स्मारक उभारण्यात येते. हा प्रश्न सर्वप्रथम बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांनी एका जाहिर सभेतून उपस्थित केला होता. सवर्ण व्यक्तींच्या मृत्यू पश्चात स्मारकांसाठी शेकडो एकर जागा मिळते आणि आमच्या झुग्गी झोपडीसाठी हातभर जागा मिळत नाही ! दलित शोषित बहुजन समाजातील महामानवांसाठी राजघाटावर जागा का मिळत नाही ?
बहुजन नायक कांशीरामजी यांनी हा संवेदनशिल प्रश्न उपस्थित केल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सभा संपल्यावर राजघाटावर जाऊन म. गांधींच्या समाधीवरील दिपस्तंभाची मोडतोड केली होती, तेंव्हा देशभर एकच खळबळ उडाली होती. मग कुणाच्या समाधीला किती एकर जागा आहे त्याची आकडेवारी समोर आली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तेंव्हा त्यांचे प्रेत मुंबईला आणून अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर उपप्रधानमंत्री बाबू जगजीवन राम यांचे निधन झाले तेंव्हा त्यांचे प्रेत बिहारमधील चांदवा या त्यांच्या गावी पाठविण्यात आले. भारतीय राजकारणाचे गणित बदलणाऱ्या मा. कांशीरामजी यांचे निधन झाल्यावर त्यांच्या अंत्यविधीसाठी देखिल राजघाटावर जागा देण्यात आली नाही.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासाठी मात्र राजघाटावर सात एकर जागा देण्यात आली. तिथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले. तो मान डाॅ. मनमोहन सिंह यांना का देण्यात आला नाही ? काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनी रितसर अर्ज करुन मनमोहन सिंह यांच्या अंत्यविधीसाठी चांगली स्वतंत्र जागा देण्याची व त्याच ठिकाणी स्मारक उभारण्याची सरकारकडे मागणी केली होती. त्याची दखल मोदी सरकारने घेतली नाही. जागा निश्चितीसाठी चार पाच दिवस लागू शकतात असे मोघम उत्तर देऊन अंत्यविधी निगमबोध घाटावरच होईल असा पवित्रा सरकारने घेतला. भारताचे दहा वर्ष प्रधानमंत्री राहिलेल्या व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ज्यांना आपले गुरु मानत होते त्या डाॅ. मनमोहन सिंह यांचा अंत्यविधी जिथे रोज शेकडो प्रेत जाळले जातात त्या सामान्य निगमबोध घाटावर करण्यात आला. हा मनमोहन सिंह यांचा नव्हे तर त्यांना चाहणाऱ्या जगभरातील करोडो लोकांचा अपमान आहे. शिख समाजाचा देखिल हा अपमान आहे तर काँग्रेसच्या जिव्हारी लागणारी ही बाब आहे. भारताच्या या महान सुपुत्राचा अपमान करुन मोदीजी आपण काय मिळविले ? एक असूरी आनंदच ना..?
– इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
अध्यक्ष, अ. भा. गुरु रविदास समता परिषद.
मो. ८५५४९९५३२० नांदेड