नांदेड (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरूवात झाली आहे. या संदर्भाचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून सामाजिक न्याय विभागात संपर्क साधून मुला-मुलींनी आपल्या पुढील शिक्षणासाठी या सोयीचा उपयोग घ्यावा.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अव्वर सचिव प्र.व्ही.देशमुख यांच्या डिजीटल स्वाक्षरीने जारी झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या संधी शिक्षणासाठी उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर मुलांसाठी 230 आणि मुलींसाठी 213 शासकीय वसतीगृहही सुरू आहेत. मुलांच्या वसतीगृहांमध्ये 23 हजार 208 विद्यार्थी आहे. मुलींच्या वसतीगृहामध्ये 20 हजार 650 विद्यार्थीनी आहेत. यामध्ये निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता वसतीगृहातील जागेची मर्यादा छोटी पडत आहे.
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये, महानगरपालिकांमध्ये, जिल्ह्यातील संस्थांसाठी आणि तालुक्यातील शिक्षणासाठी अशा चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये अनुक्रमे 60 हजार रूपये, 51 हजार रूपये, 43 हजार रूपये आणि 38 हजार रूपये हे प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन सत्रासाठी दिले जातात आणि त्यातून त्यांनी आपल्या उच्च शिक्षणाला पुर्णत्वाकडे न्यायचे आहे. यासाठी गरजवंत विद्यार्थ्यांनी सामाजिक विभाग अथवा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक क्र. 20241226750012722 हा शासन निर्णय पाहून आपल्या सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. असे आवाहन वास्तव न्यूज लाईव्हतर्फे करण्यात येत आहे.