नांदेड (प्रतिनिधी)-वर्षात पोलिसांच्या होणार्या मूल्यांकनामध्ये सन २०२२ या वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे अशी निवड भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने केली आहे.
सन २०१६ मध्ये झालेल्या एका बैठकीनुसार निकोप स्पर्धा वाढावी, कायदा व सुव्यवस्था प्रतिबंध राहावी, गुन्हे प्रतिबंध व्हावेत, दोष सिध्दीमध्ये सुधारणा व्हावी अशा दहा मूल्यांकनावर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड करण्याचा निर्णय भारताच्या गृहमंत्रालयाने केला होता.
स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्याचा विचार करुन देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्राच्या पोलीस ठाण्याचा समावेश होण्याच्या दृष्टीने, राज्यातील पोलीस ठाण्याची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे तसेच गुन्हेगारांना प्रतिबंध करणे, पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रोत्साहीत करणे हा हेतू साध्य करण्यासाठी दरवर्षी राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पाच पोलीस ठाण्याची निवड करण्यात येते. आणि त्या पाच पोलीस ठाण्यांना सन्मान चिन्ह आणि बक्षिस प्रदान करण्यात येत असते.
गृहमंत्रालय भारत सरकार नवीदिल्ली यांनी सन २०२२ या वर्षातील कार्य मूल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेकरिता निश्चित करुन दिलेले गुणांकन, निकष व नियमावली इत्यादीचा बारकाईने विचार करुन परिक्षेत्र/आयुक्तालय स्तरावरील समितीने निवड केलेल्या प्रत्येकी दोन उत्कृष्ट पोलीस ठाण्यामधून पाच सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड करण्यासाठी राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात आली होती. त्यामधील २०२२ या वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्ो म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांना पन्नास हजार रुपये रोख बक्षिस मिळाले आहे. माजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, विद्यमान पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, माजी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांचे आणि देगलूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अंमलदाराचे कौतूक होत आहे.