केंद्र सरकारची भुमिका आता लपून राहिलेली नाही-रमेश चेन्नीथल्ला

नांदेड (प्रतिनिधी)-मोदी सरकार यांची संविधान बदलाच्या संदर्भाची भूमिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची गरळ सभागृहात ओकून भारतीय जनता पक्षाने आपले खरे रुप दाखविले असून, संघ परिवाराशी नाळ जोडलेल्या या सरकारचा चेहरा यानिमित्ताने समोर आला.गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी खा. वर्षा गायकवाड, खा. रविंद्र चव्हाण, कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, सुरेश गायकवाड तसेच कॉंग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.चेन्नीथल्ला म्हणाले की, हे सरकार संघाच्या तालावर नाचते. मनुवादी प्रवृत्तीच्या या सरकारने चारसो पार चा नारा दिला. मात्र देशातील जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिले नाही. अन्य पक्षांच्या कुबड्या घेत ते सरकार स्थापन झाले. हे सरकार संविधान बदलण्याच्या मनस्थितीत असून, गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करुन त्याला पुष्टी दिली आहे. दुसरीकडे खुलासा करताना अमित शहा यांनी आपले वक्तव्य तोडून मोडून दाखविण्यात आले, असा खुलासा केला. प्रत्यक्ष संसदेतील त्यांचे सर्व भाषण दूरदर्शनच्या चॅनलवर आजही आहे. असे असताना त्यांनी केलेला खुलासा हस्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील बीड व परभणी येथील घटना चिंताजनक असून, त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची आज परभणीत भेट आहे. ज्या पध्दतीने कायदा व सुव्यवस्था या राज्यातील बिघडली आहे, तेथे मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातील व राज्यातील सरकारच्या विरोधात येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असून, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात येणार आहे. आजपासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगून संसदेच्या परिसरात झालेले आंदोलन हा त्याचाच एक भाग होता. कुठल्याही परिस्थितीत कॉंग्रेस देशातील संविधानाचे रक्षण करुन ते बदलू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
परभणीच्या घटनेसंदर्भात खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेला खुलासा संतापजनक असून, मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला असताना त्याचा मृत्यू श्वसनाच्या त्रासाने झाला, अशी दिशाभूल करणारी माहिती दिली. ज्याप्रमाणे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली, त्याचप्रमाणे परभणीच्याही पोलीस अधीक्षकांची बदली झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!