मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करा
नांदेड :- महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 रोजी मराठी भाषा धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार महसूल व अन्य सर्वच विभागाने प्रशासनात मोठ्याप्रमाणात मराठी भाषेचा वापर करावा. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यासंदर्भात मराठी भाषा विभागाने व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासकीय आदेशाचे पालन करण्यात यावे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेतून संभाषण करणे, मुळप्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिपण्या, आदेश, संदेशवहन मराठीतूनच करणे आवश्यक आहे. सूचना फलक, अधिकाऱ्याचे नाव फलक, अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जाहिरात प्रसिद्धी, प्रचार यामध्ये देखील मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. मालमत्ता खरेदी विक्री करतांना संस्था यांच्यामध्ये करण्यात येणारे खरेदीदस्त या देखील मराठी, इंग्रजी असा द्वैभाषिक स्वरूपात नोंदणी आवश्यक आहे. प्रसार माध्यमांनी देखील वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती, निविदा सूचना मराठी भाषेतूनच देणे अनिवार्य आहे. त्यामुळे मराठी भाषेसंदर्भात असणाऱ्या सर्व निर्देशाचे पालन करण्याबाबत दक्ष असावे असे आवाहन करण्यात आले आहे.