नांदेड(प्रतिनिधी)-गणेशनगर धर्माबादमध्ये झालेल्या चोरीचा तपास धर्माबाद पोलीसांनी 24 तासात पुर्ण करत त्यात चोरी गेलेला पुर्ण 100 टक्के ऐवज जप्त करून उत्कृष्ट कार्यवाही केली आहे.
दि.13 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत गणेशनगर धर्माबाद येथे राहणारे लक्ष्मण मोहनराव रामपुरे हे आपल्या पत्नीसह शेतात गेले असतांना त्या वेळेत चोरट्यांनी त्यांचे घरफोडले. त्यातून सात प्रकारचे वेगवेगळे सोन्याचे 132.47 ग्रॅमचे दागिणे चोरले होते. त्या संदर्भाने धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 344/2024 दाखल झाला होता.
धर्माबादचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिक्षिक प्रियंका पवार, पोलीस अंमलदार विलास मुस्तापुरे, संतोष कुमरे, महेश माकुरवार, सचिन गडपवार, सय्यद फहिम, किरण मोरे यांनी बेल्लुर (बु) ता.धर्माबाद येथील श्रीकांत विठ्ठल बनसोडे, यास ताब्यात घेवून विचारणा केली असता. त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानेच 132.47 ग्रॅमचे दागिणे चोरले होते. ते सर्व दागिणे जशास तसे जप्त करण्यात आले आहे.
3 लाख 94 हजार 440 रुपयांच्या चोरीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणणाऱ्या धर्माबाद पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपते यांनी कौतुक केले आहे.