सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे-ऍड. आंबेडकर

परभणी (प्रतिनिधी)- परभणी येथील युवक सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून तो अति मारहाणीमुळे झालेल्या शॉकमुळे झाला आहे. ही मारहाण पोलीसांनीच केलेली आहे आणि जे पोलीस यात सहभागी असतील. त्यांना आपण शिक्षेपर्यंत घेवून जाऊ असा संदेश वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला.

10 डिसेंबर रोजी परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृती विटंबनेनंतर आलेल्या प्रतिक्रियेत जोरदार विरोध झाला. यात रस्त्यावर बसून निवेदन लिहित असतांना पाहिलेल्या एका छायाचित्रात सोमनाथ व्यंकटी सुर्यंवशी हा युवक दिसत होता. त्यानंतर त्याला अटक झाली आणि तो न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात गेला. तेथे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले. दि.16 डिसेंबर रोजी सहा डॉक्टारांच्या एका विशेष पथकाने इन कॅमेरा त्यांचे शवविच्छेदन केले आणि त्यांनी दिलेल्या अहवालात सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू हार्टऍटकने झाला नसून त्याला झालेल्या अतिमारहाणीमुळे शॉक लागून झाला आहे असे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यंानी सांगितले. सोमनाथ सुर्यवंशीच्या अंतिमक्रियेत सुध्दा बाळासाहेब आंबेडकर स्वत: सहभागी झाले होते.
या प्र्रसंगी पुढे बोलतांना ऍड. आंबेडकर म्हणाले की, जे काही पेरल गेल आहे तेच उगवते. तेंव्हा व्यवस्थेमध्ये सुध्दा अर्थात प्रशासनामध्ये धर्म पेरला गेला आणि त्यातून द्वेष उगवला आहे आणि ज्याच्या डोक्यात धर्म आणि द्वेष बसतो. तो बेफान होतो, बेकाबु होतो आणि असेच काही पोलीस बेकाबु झाले आणि त्यांनी कायदा आपल्या हातात घेवून लोकांना बडवले आहे. हा प्रकार थांबणार नाही. हा प्रकार आपल्याला थांबवायचा असेल तर आपल्याला दारु आणि इतर नशेची पदार्थ बंद करावे लागेल, 4 किलो मिटर दररोज पळावे लागेल. का असे मी सांगतो आहे कारण बेकाबु झालेल्या लोकांसमोर उतरायचे असेल तर हीच त्याची खरी पध्दत आहे. भारतात जात, धर्म, समाज आणि काहीही असो त्या प्रत्येक व्यक्तीला भारतात राहण्याचा अधिकार आहे. पण धर्म आणि द्वेष पेरल्या गेल्यामुळे विश्र्वास संपला आहे आणि हा विश्र्वास बदलायचा असेल तर त्या व्यवस्थेचा भाग आपल्याला होता आले पाहिजे. म्हणजेच प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये आपली माणसे पोहचली पाहिजे, फोर्समध्ये आपली माणसे गेली पाहिजेत. तरच आपण त्या बेकाबु झालेल्या लोकांसमोर समर्थपणे उभे राहु.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, व्यवस्थेवर नियंत्रण करायचे असेल तर आपली एक झोपडी हवी. या ठिकाणी झोपडी म्हणजे आपला स्वतंत्र विचार हवा, आपले वेगळेपण दाखवता आले पाहिजे असा आहे. परभणी मधील फुले-शाहु- आंबेडकर विचाराने जगणाऱ्या बहाद्दरांनी दिलेला लढा दमदार होता. अशाच मार्गातून झोपडी तयार होत असते. आज भयभित वातावरण असले तरी कालपर्यंत मी तक्रार देणार नाही असे म्हणणारा व्यक्ती आज तक्रार द्यायला तयार आहे, ज्यांनी मारहाण केली त्यांची नावे सांगायला तयार आहे. आज आपल्यातील सोमनाथ सुर्यवंशी हा लढावू योध्दा निघून गेला आहे. ते आपले नुकसान आहे. तरी पण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. सरकारला आपण भरपूर काही देतो. जसे वीज, उद्योग, वाहतुक या सर्व कामांमध्ये श्रम हे आमचेच आहेत. तरी सरकार हल्ले थांबवू शकत नाही. म्हणजे हे सरकार कमकुवत आहे असे आंबेडकर म्हणाले.
मी पोलीस अधिक्षकांना सांगितले की, युध्दातील मिसाईल हे शस्त्र दिशा भरवून, जागा ठरवून सोडले जाते. पण पोलीस दलात असे काही अन गाईडेड मिसाईल आहेत. म्हणजे पोलीस आहेत जे कोठेही जातात आणि कोठेही बॉम्ब पाडतात. त्यांना रोखण्याची गरज आहे. परभणीमध्ये झालेल्या सर्व तक्रारांनीमधील तक्रारदारांनी खटल्याचा निकाल येईपर्यंत कायम राहावे. परिस्थितीअनुरूप साक्षीदारांचा विचार बदलतो आणि आपल्याला न्याय मिळत नाही. त्यासाठी तुम्ही स्वत:वर विश्र्वास ठेवून कणखर राहा तरच आमच्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा नक्कीच होईल.
परभणीतील फुले-शाहु-आंबेडकर विचारांच्या हजारो समर्थकांच्या साक्षीने सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सोमनाथच्या आई सांगत होत्या की, माझ्या लेकरासोबत झाले तसे इतर कोणाच्या लेकरासोबत होवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!