सोमनाथ, ओझे नाही ! माझा भाऊ आहे !!

 

कुणी तरी एडिट केलेले हे चित्र सोशल मिडियावर सध्या फिरत आहे. ते फार बोलके आहे. चित्राच्या वरच्या बाजूला परभणी येथील शहिद सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी यांचा पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला, त्याचे प्रेत दाखविण्यात आले आहे. शरीरभर मारहाणीच्या जखमांनी छिन्नविछिन्न अवस्थेतील हा मृतदेह पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्र बंदची हाक कुणी जरी दिली असली तरी त्यात संपूर्ण आंबेडकरी व संविधानप्रेमी समाज सहभागी होणे हे साहजिक आहे. त्याचे प्रत्यंतर आज आले.

चित्राच्या खालच्या बाजूला जपानच्या युद्धातील एक सुप्रसिद्ध फोटो आहे. युद्धात मरण पावलेल्या आपल्या भावाचे प्रेत पाठीवर घेऊन तो बालक अंत्यविधीसाठी चांगल्या जागेच्या शोधात खूप अंतर चालून जातो आहे. वाटेत त्याला सैनिक भेटतात. ते विचारतात की हे ओझे घेऊन आणखी कुठवर जाणार आहेस ? फेक ते ओझे आणि निघून जा ईथून, कारण ही युद्धभूमी आहे. तेंव्हा तो बालक म्हणतो, “ओझे नाही, हा माझा भाऊ आहे..!” हा फोटो आज भावाच्या जागतिक प्रेमाचे प्रतिक झाले आहे.

या चित्रात तिसरा फोटो मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे यांचा आहे. ते दोघे एकमेकांना पेढे भरवित आहेत. रोम जळत असताना तेथील राजा फिडेल वाजवित होता म्हणे..! तसे आज १५ डिसेंबर रोजी सोमनाथ सुर्यवंशीच्या पोलीस मारहाणीतील मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असतांना, शोकमग्न असतांना नागपुरात पेशवाईचे प्रतिक असलेल्या फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा मोठ्या थाटात वाजतगाजत संपन्न झाला. एकीकडे दीनदलितांचा आक्रोश आहे तर दुसरीकडे मंत्रीपदाच्या शपथविधीचा झगमगाट आहे. आजच शपथ घ्यायचा चांगला मुहूर्त होता वाटते.

चित्राच्या शेवटी निरागस चेहऱ्याचा कायद्याचा पदवीधर विद्यार्थी असलेल्या सोमनाथ व्यंकटी सूर्यवंशी या कट्टर आंबेडकरवादी ओबीसी तरुणाचा फोटो आहे, ज्याने संविधानासाठी कुर्बानी दिली आहे. आपल्या सर्वस्वाचे समर्पण केले आहे. एकंदरीत या सगळ्या फोटोंचे चांगले काॅम्बीनेशन झाले आहे.

परभणी येथे रेल्वे स्टेशन समोरील विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड सोपान दत्तराम पवार या ४५ वर्षाच्या मिर्झापूर ता. जि. परभणी येथील एका सज्ञान सवर्ण धडधाकट शहाण्या व्यक्तीने केली. त्यामुळे परभणी पेटली. आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हे सोपानला माथेफिरु म्हणत आहेत. होय तो माथेफिरुच असेल पण वेडा नाही. संघाच्या जातीयवादी विचाराने त्याचे माथे फिरविले असावे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान विरोधी विचारांनी कुणीतरी देशद्रोह्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सोपानच्या डोक्यात कचरा भरला असावा. ज्याचे असे माथे फिरले तेच लोक असे अविचारी कृत्य करतात.

सोमनाथ हा वडार जातीत जन्मलेला ओबीसी प्रवर्गात मोडणारा कायद्याचा पदवीधर सुशिक्षीत युवक आंबेडकरी विचारधारेत वाढला, म्हणून संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड त्याला सहन झाली नाही म्हणून यासाठी काढण्यात आलेल्या संविधान सन्मान मोर्चात त्याने सक्रीय सहभाग घेतला, याचा राग मनात धरुन दगडफेकीचा आरोप लाऊन पोलिसांनी सोमनाथला बेदम मारहाण केली, ते वरील संतापजनक चित्रात अगदी स्पष्ट दिसतेच आहे.

कायद्याच्या पदवीधर असलेल्या एका सुशिक्षीत युवकास एवढ्या निर्दयीपणे बेदम मारहाण करणारे परभणीचे हे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे शैतान होते की हैवान होते ? आंबेडकर विरोधी मानसिकतेत आकंठ बुडालेले हे जातीयवादी पोलीस कर्मचारी पगार शासनाचा घेतात पण काम मनुवादी व्यवस्थेचे करतात. क्रौर्याची एवढी परिसिमा त्यांनी का गाठली ? त्यांचा बोलविता धनी कोण आहे ? सोमनाथने त्यांचे एवढे काय नुकसान केले होते की त्यांनी क्रूर मारहाण करुन सोमनाथचा एकदम जीवच घेतला ! फडवणीस साहेब, कशाला शिव फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता ? या महामानवांच्या नावाचा जप करीत आपण पेशवाई राबवित आहात की काय अशी शंका येते !

विशेष म्हणजे सोमनाथ सुर्यवंशी हा न्यायालयीन कोठडीत होता. MCR म्हणजे न्यायालयीन कोठडीत कसलीही मारहाण न करता फक्त कायदेशीर चौकशी केली जाते. PCR म्हणजे पोलीस कोठडीत आरोपीला गुन्हा कबूल करुन घेण्यासाठी पोलीस बेदम मारहाण करुन गुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न करतात. मग ॲड. सोमनाथ सुर्यवंशी हा न्यायालयीन कोठडीत असताना व त्याची जमानत मंजूर झालेली असताना त्याला कोणी व का मारले..? कशासाठी मारले ? संविधान सन्मान मोर्चात सहभागी झाल्याचा राग अशा क्रूर पद्धतीने व्यक्त करायचा असतो काय ?

आता सारवासारव करण्यासाठी पोलीस प्रशासन म्हणत असेल की सोमनाथला हृदयविकाराचा झटका आला. अरे हो पण हा झटका का आला ? बेदम मारहाणीमुळेच ना ? बेदम मारहाण करुन त्याच्या शरीराची चाळणी करण्यात आली, अगदी शेवटच्या टप्प्यात त्याला उपचारासाठी दवाखान्यात आणण्यात आले. तोवर त्याचा मृत्यू झाला होता. फडवणीस यांच्या पेशवाईतील पोलिसांच्या निर्दयी वर्तनाने एका सुशिक्षीत आंबेडकरी विचारधारेच्या युवकाचा बळी घेतला. या हरामखोर पोलिसांवर फडवणीस साहेब मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतील काय ? अजून तरी कुणाही पोलिसाचे साधे निलंबनही करण्यात आले नाही ! सगळी कांही सरकारी मेहरबानी !

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरले म्हणून जर आपल्या तरुणाईला व सोमनाथला मरेपर्यंत एवढा मार दिला जात असेल तर हा प्रश्न आपण इथल्या जातीयवादी पोलीस प्रशासन आणि मनुवादी व्यवस्थेला विचारणार आहोत की नाही ? हा आज आमच्या समोरील खरा प्रश्न आहे. परभणी येथील वादग्रस्त पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांचे वर्तन नेहमीच संशयास्पद राहिले आहे. नांदेडमधील जवळपास सर्वच पोलीस स्टेशनला त्यांनी ड्युटी केली आहे पण दलितांना त्यांनी कधी अभय दिले नाही. नांदेड जवळील बोंढार येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातही त्यांचे वर्तन संशयास्पद राहिले आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातही त्यांची भूमिका संशयास्पद होती. परभणीतील शेकडो दलितांवर त्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. सध्या त्यांची बदली लातूरला झाली असली तरीही ते परभणी येथेच ठाण मांडून का बसले आहेत ? याचे गौडबंगाल काय ?

बहुजन समाजातील उच्चशिक्षित लोक डाॅक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, वकील, सनदी अधिकारी अशा अत्याचारावर काय दिशा देतील की आपापल्या घरात गोधडीत लपून बसतील..? आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपला आंबेडकरी कार्यकर्ता तरुण रस्त्यावर उतरुन आंबेडकरी विचारांची चळवळ जिवंत ठेवतो म्हणून आपण कार्यालयात सुखाने नोकरी करतो. आता स्वस्थ बसून चालणार नाही. एकमेकांवर शंका कुशंका व्यक्त करीत यापुढे आपण आपणालाच कमजोर करायचे नाही.

कोण होता सोमनाथ ? आंबेडकरवादाचा एक धगधगता निखारा. त्याच्या जातीवर जाऊ नका. आंबेडकरवाद हा कुणा एका जातीचा विषय राहिला नाही. नाही तरी आमचेच लोक कधी मातंगावर संशय घेतात तर कधी चांभारावर राग व्यक्त करतात. ढोर डक्कलवार भंगी हे आपले नाहितच, ते आंबेडकरवादी नाहित असा सूर आळवितात. आज एका ओबीसी व्यक्तीने आंबेडकरी विचारांसाठी, भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. अपवादाने असले तरी मांग, चांभार, ढोर, भंगी, डक्कलवार, ओबीसी समाज आंबेडकरी विचार प्रवाहात स्वयंप्रेरणेने येत आहेत, त्यांचे उदार मनाने आपण स्वागतच केले पाहिजे.

जपानी युवक प्रेताला आपला भाऊ म्हणतो, त्याचे ओझे पाठीवर घेऊन फिरतो. हे ओझे नाही, माझा भाऊ आहे असे म्हणतो. आज तीच वेळ आमच्यावर आली आहे. सोमनाथ सुर्यवंशी कोण आहे ? तो आमचा भाऊ आहे. त्याने आमच्यासाठी व आमच्या देशाच्या संविधानासाठी आपले बलिदान दिले आहे. म्हणून तर शवविच्छेदनासाठी छ. संभाजीनगरला सोमनाथचे प्रेत पोहचण्याआधीच घाटीला आंबेडकरी युवकांनी गर्दी केलेली असते ! का ? का तर सोमनाथ सुर्यवंशी हा आमचा भाऊ आहे ! तो ओझे नाही, तर आमचा सखा भाऊ आहे !! सोमनाथ आमचा भाऊ आहे !!!

      – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

अध्यक्ष, अ. भा. गुरु रविदास समता परिषद

मो. 855 499 53 20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!