नांदेड(प्रतिनिधी)-काल मध्यरात्री देगलूरकडून नांदेडला येणाऱ्या एका ऍटोला कुंटूर पाटीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि एकावर उपचार सुरू आहे. महामार्ग सुरक्षा पथकाने जखमीला त्वरीत दवाखान्यात आणले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार 14 डिसेंबरच्या रात्री 11.55 वाजता महामार्ग सुरक्षा पथक देगलूर येथील लोकांना माहिती मिळाली की, कुंटूर पाटीजवळ अपघात झाल आहे. तेंव्हा त्वरीत प्रभावाने पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत नारमोड, पोलीस अंमलदार चंद्रकांत बिरादार, वडजे, कागणे, पल्लेवाड, पांडे, मुंडकर आदी पोलीस अंमलदार घटनास्थळी गेले.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर कुंटूर पाटीजवळ, पंचवटी हॉटेल समोर देगलूरकडून नांदेडकडे येणारा ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.8036 यास कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिली आणि तो पळून गेला. त्या ठिकाणी ऍटोतील दोन जण मरण पावले होते आणि एक जखमी अवस्थेत होता. महामार्ग सुरक्षा पथकातील जवानांनी जखमी असलेल्या अफसर खान बन्ने खान (38) रा.खडकपुरा नांदेड यास त्वरीत प्रभावाने उपचारासाठी दवाखान्यात पाठविले. या ठिकाणी मरण पावलेल्या व्यक्तींची नावे एजाज खान बन्ने खान (42) रा.खडकपुरा नांदेड आणि मोहम्मद अफसर रा.बान्सवाडा जि.निजामाबाद (तेलंगणा) अशी आहेत. घटना घडल्यावर महामार्ग प्रादेशिक विभागाचे एस.डी.पठाण यांनी सुध्दा तेथे भेट दिली होती. पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीस ठाणे कुंटूर करीत आहे. या ऍटोमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय चालत असे. विशेष करून आठवडी बाजारांमध्ये फिरून हे कुटूंब हा व्यवसाय करत होते. काल देगलूर येथील आठवडी बाजार संपल्यानंतर हा अपघात घडला आहे. ज्यात एका भावाचा मृत्यू झाला आहे. दुसरा जखमी आहे.