नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृहविभागाने भारतीय पोलीस सेवेतील चार अधिकाऱ्यांना बदल्या दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सचिव पदावर असलेले ब्रिजेशसिंह यांना सुध्दा बदलण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागातील सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेतील अपर पोलीस महासंचालक डॉ.सुखविंदरसिंह यांना पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांचे सचिव असलेले ब्रिजेशसिंह यांची बदली करण्यात आली आहे आणि त्यांच्या जागी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरात पोलीस उपआयुक्त असलेल्या आर.राजा यांना पोलीस अधिक्षक पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे हे पद तात्पुरते अवनत करून पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती दिली आहे. पुणे शहरात पोलीस उपआयुक्त पदावर असलेल्या तेजस्वी सातपुते यांना पोलीस अधिक्षक शस्त्र निरिक्षण शाखा पुणे येथे पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती दिली आहे. याच विभागातील पोलीस अधिक्षक अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांना राज्यपालांचे परिसहाय्यक या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.