नांदेड(प्रतिनिधी)-आपली दुचाकी अत्यंत कलाबाजी करत चालवणाऱ्या एका युवकाविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दुचाकीच्या सायलेंसरमधून फटाक्यांचा आवाज येत होता.
पोलीस अंमलदार शंकर रेवन माळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात 9 डिसेंबर रोजी रात्री गस्त करत असतांना एक युवक वेड्या वाकड्या पध्दतीने दुचाकी चालवत होता. त्याच्या दुचाकीमध्ये फटाके फोडल्यासारखा आवाज येत होता. पोलीसांनी ती दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.डब्ल्यू.4211 किंमत 80 हजार रुपयांची थांबवली आणि विचारणा केली असता दुचाकी चालवणाऱ्या युवकाचे नाव गणेश भुजंगराव मोरे (23) रा.शाहुनगर वाघाळा असे होते. नांदेड ग्रामीण पोलीसांनी गणेश मोरे विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 125 आणि 281 नुसार गुन्हा क्रमांक 1141/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अंमलदार संतोष जाधव, माधव माने, ज्ञानेश्र्वर कलंदर यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.