नांदेड(प्रतिनिधी)-आज जागतिक दिव्यांग दिनी आक्रोश मोर्चा काढून दिव्यांगांचे हृदय सम्राट आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार बच्चू कडू यांचे पुर्नवसन करण्याच्या मागणीसह एकूण 18 मागण्यांचे निवेदन दिव्यांगांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आज जागतिक दिव्यांग दिन. या दिनाचे औचित्य साधून अनेक दिव्यांगांनी एक आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 26 जानेवारी 2025 या प्रजासत्ताक दिनी तिव्र आंदोलन करू असा इशारा या निवेदनात लिहिण्यात आला आहे.
दिव्यांग व्यक्तींनी दिलेल्या निवेदनात संपुर्ण राज्यात दिव्यांग अधिकार अधिनियम आरपीडब्ल्यूडी कायदा 2016 ची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. महाराष्ट्रातील दिव्यांगांचे आधार स्तंभ ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांचे राजकीय पुर्नवसन करून त्यांना त्वरीत मंत्रीमंडळात समाविष्ट करावे. अचलपूर विधानसभा मतदार संघात मतदान पत्रिकेवर मतदान घेण्यात यावे. दिव्यांग व्यक्तीचे महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018 ची तात्काळ काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. नांदेड जिल्ह्यात, संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरीक स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगांचा राखीव निधी दरवर्षी खर्च करण्यात यावा. आमदार आणि खासदारांना दिव्यांग निधी दरवर्षी काटेकोरपणे खर्च करण्यात यावा. दिव्यांगांना विनाअट घरकुल वितरीत करावे. अशा एकूण 18 मागण्यांसह हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर दिव्यांग कल्याणकृती समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल सिताराम माळवे यांच्यासह चंपतराव पाटील, आदित्य पाटील, देविदास बडेवार, रवि केंकरे, प्रदीप हनमंते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.