नांदेड(प्रतिनिधी)-22 ऑगस्ट रोजी कोनाळे कोचिंग क्लासेसमधून एका अल्पवयीन बालकानेच अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. विमानतळ पोलीसांनी आज पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या माध्यमाने पाठविलेल्या माहितीनुसार त्यांनी पळवून नेणारा अल्पवयीन बालक आणि पळवून नेण्यात आलेली अल्पवयीन बालिका ताब्यात घेवून अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहिती दिली आहे.
दि.22 ऑक्टोबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2), 87 आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 333/2024 दाखल झाला होता. या एफआयआरनुसार 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता एक अल्पवयीन बालिका कोनाळे क्लासेसला जाते म्हणून गेली ती परत आलीच नाही. तिच्या घरच्या मंडळींनी अनेक नातेवाईकांकडे शोध घेतला. बऱ्याच लोकांना विचारणा केली. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झाला.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांच्या मार्गदर्शनात विमानतळचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक प्र्रदीप साखरे, पोलीस अंमलदार डोईफोडे आदींनी या घटनेचा शोध लावला तेंव्हा अल्पवयीन बालक आणि बालिका दोघेही माळशिरस जि.सोलापूर येथे असल्याचे समजल्यानंतर त्यांना तेथून ताब्यात घेतले आणि नांदेडला आणले आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुध्द कायदेशीर प्रक्रियेनुसार काम सुरू आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विमानतळ पोलीसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
हा झालेला प्रकार नक्कीच गंभीर आहे. पालकांनी आपल्या बालक आणि बालिकांकडे अत्यंत बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. माळशिरसमध्ये कोण असेल ज्याने या बालकांना आश्रय दिला. त्याचाही शोध होण्याची गरज आहे. पालकांनी आापली बालके आणि बालिका कोणत्या पध्दतीने घराबाहेर जात आहेत आणि परत येत आहेत. यावर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. अल्पवयीन बालक आणि बालिकांना एनरॉईड मोबाईल देवू नये जेणे करून बऱ्याच गोष्टींच्या बालकांना आज माहित होणे गरजेचे नाही त्या होतात आणि त्यातून असंख्य प्रकार घडतात ते थांबतील. समाजामध्ये आपल्या बालक-बालिकांना दृष्टीकोण देण्याची खरी जबाबदारी पालकांचीच आहे. त्यामुळे आमच्या मुलीसोबत असे घडते, कोणी पाहत नाही, कोणी मदत करत नाही असे म्हणण्यामध्ये काही एक अर्थ नाही. आमच्या या विनंतीला नक्कीच कोणी तरी पालक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.