नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकी स्वारानों आता हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. नसता तुमच्याविरुध्द मोटार वाहन कायद्या क्रमांक 129/194(डी) प्रमाणे कार्यावाही होईल. आम्ही लिहित असलेली बाब एका दुचाकी वाहन चालकासाठी नसून त्याच्या पाठीमागे बसणाऱ्यासाठी सुध्दा हेल्मेट आवश्यक आहे असे आदेश वाहतुक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कार्यालयातील मुख्यालयाचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांना पाठविले आहे.
वाहतुक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने 26 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील 9 पोलीस आयुक्त, मुंबई वाहतुक विभागाचे सहआयुक्त आणि इतर सर्व पोलीस अधिक्षक यांना लिहिलेल्या पत्राप्रमाणे मागील पाच वर्षामध्ये रस्ते अपघाताचा आढावा घेतला असता विना हेल्मेट दुचाकी स्वार आणि पीलिएन रायडर यांचे अपघात, जखमी यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 1988 च्या मोटार वाहन कायद्यातील कलम 128 आणि 129 मध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे दुचाकी स्वारांनी एकटा असेल किंवा दोघे असतील तरी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सुचनांची माहिती सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना देण्यात यावी आणि कलम 128 आणि 129 ची अंमलबजावणी कडक स्वरुपात करण्यात यावी. वाहतुक विभागाचे खटले भरतांना ई चालन मशीनमध्ये विना हेल्मेट दुचाकी स्वार आणि विना हेल्मेट पीलीयन रायडर या दोन्ही प्रकारांमध्ये मोटार वाहन कायद्याच्या कलम 129/194 प्रमाणे प्रभावी कार्यवाही करावी जेणे करून दुचाकी स्वार चालक, पीलीयन रायडर यांचे अपघात, मृत्यू आणि जखमींची संख्या निश्चितप्रकारे कमी होईल.
या आदेशाने हेल्मेट धारकांचा हेल्मेट कारखान्यांचा धंदा जोरात सुरू होईल तसेच पोलीसांना सुध्दा एक नवीन कार्यवाही करण्यासाठी मोकळीक मिळणार आहे. दुचाकी चालकांनी आणि धारकांनी सुध्दा आता हेल्मेट शिवाय कोणी दुचाकी चालवू नये आणि आपली दुचाकी दुसऱ्यांना देत असताल तर त्याच्याकडे हेल्मेट आहे की, नाही याची खात्री करूनच त्याला आपली दुचाकी द्या नाही तर दंड आपोआप तुमच्या मोबाईलवर जमा होईल.