4 लाख रुपये रोख सापडले, अनेक अवैध संपत्तीचे कागदपत्र सापडले, अनेक दिव्यांग शाळांचे संशयास्पद कागदपत्र सापडले
नांदेड(प्रतिनिधी)-40 लाखांची लाच घेणाऱ्या दोन जणांची चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयाने त्या दोघांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. एका अपंग संस्थेच्या संचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अपंग शाळेतील शिक्षकांचे थकीत असलेले एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेले बिल काढून देण्यासाठी त्यांना 54 लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यांचे जवळपास दीड कोटीचे बिल मंजुर झाल्याबरोबर बॅंकेतून लाचेची 40 लाख रुपये काढून शिवराज विश्र्वनाथ बामणे आणि चंपत आनंदा वाडेकर हे दोघे घेवून जात असतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडले. 23 नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आज 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती.
आज पोलीस कोठडी संपल्यानंतर या दोघांना पुन्हा हजर करून वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यावेळी जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी चंपत वाडेकर यांच्या घर झडतीमध्ये 3 लाख 91 हजार 80 रुपये सापडले आहेत. तसेच समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्या कार्यालयाची आणि घराची झडती घेण्यात आली आहे. दोन्ही आरोपींच्या आवाजाचा नमुना रेकॉर्ड करायचा आहे. तसेच शिवराज बामणे यांच्याकडे त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा बरीच अवैध संपत्ती आहे. शिवराज बामणे यांच्या घरात समाज कल्याण अधिकारी यांच्या स्वाक्षरीच्या नस्ती सापडल्या आहेत. सोबतच मन्मथराज ट्रेडींग कंपनी कोणाची आहे याचा शोध घ्यायचा आहे. याप्रकरणातील आरोपी यादव मसणाजी सुर्यवंशी फरार आहे त्यालाही पकडणे शिल्लक आहे. शिवराज बामणे यांच्या मोबाईलमध्ये बरेच संपत्ती खरेदी केल्याचे कागदपत्र तसेच अनेक दिव्यांग शाळांच्या संशयीत आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र सापडले आहेत. त्याबाबत चौकशी करायची आहे. संपत वाडेकर याने तिरुपती गोदगे या व्यक्तीकडून 10 लाख रुपये घेतल्याचे दिसून येत आहे. त्यातील 8 लाख रुपये मन्मथराज ट्रेडींग कंपनीच्या नावे आरटीजीएसद्वारे पाठविले आहेत. त्याचा शोध घेणे आहे. युक्तीवाद ऐकून न्यायाधीशांनी शिवराज बामणे आणि चंपत वाडेकर या दोघांची पोलीस कोठडी दोन दिवसांसाठी वाढून दिली आहे.
संबंधीत बातमी…
बापरे बाप 40 लाखांची लाच दोन जणांना पकडले; लाच मागणी 54 लाखांची स्वीकारले 40 लाख