नांदेड(प्रतिनिधी)-लेह लद्दाख येथे आपले काम करतांना बर्फाचा ढिगारा पडून शहीद झालेल्या नांदेड जिल्ह्याच्या भुमिपूत्र जवानाला आज त्यांच्या मुळ गावी हिरानगर ता.मुखेड येथे अंतिम निरोप देण्यात आला. आपल्या पित्याच्या मृतदेहाला आठ वर्षाच्या बालकाने मुखाअग्नी दिला तेंव्हा उपस्थितांचे डोळे पानावले. नांदेड जिल्हा पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून जवाना मानवंदना दिली.
सन 2006 मध्ये हिरानगर ता.मुखेड येथील सुधाकर शंकर राठोड हे सैन्य दलात गनर या पदावर रुजू झाले. पुढे त्यांच्या कामाची दखल घेत. त्यांना एअर डिफेन्स रेजीमेंटमध्ये पदस्थापना मिळाली. लेह लद्दाख, सियाचिन या भागात मागील तीन वर्षापासून ते कार्यरत होते. त्यांच्या अंगावर बर्फाचा ढिगारा पडला आणि जवानांची धावपळ झाली. परिश्रमानंतर जवानांनी आपल्या सहकाऱ्याला शोधले आणि त्याला उपचारासाठी चंदीगड येथे पाठविले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचा सहकारी सैना दलातील जवानांनी त्यांचा मृतदेह काल 26 नोव्हेंबर रोजी एका खास विमानाने नांदेडला आणला. आज त्यंाच्या मुळ गावी हिरानगर येथे असंख्य नागरीकांच्या उपस्थितीत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थितीत सुधाकर राठोड अमरे रहे अशा घोषणा देत होते. त्यांच्या रेजिमेंटचे जवान आणि नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीतून फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या आठ वर्षाच्या बालकाने त्यांना मुखअग्नी दिला तेंव्हा उपस्थितांना आपले अश्रु थांबवता आले नाही.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव, उपविभागीय गोपाळ स्वामी, पोलीस निरिक्षक भालचंद तिडके यांनी विर जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना दिली. नवनिर्वाचित आमदार डॉ.तुषार राठोड, त्यांच्या मातोश्री चक्रावती राठोड, सुशांत राठोड, कर्नल प्रसन्ना ठाकूर, पोलीस उपनिरिक्षक अमर केंद्रे, आजी-माजी सैनिक, पत्रकार संघ यांच्यासह हजारो लोकांनी सुधाकर राठोडला अंतिम निरोप दिला.