निवडणुका संपताच जिल्ह्यात नंबर 2 चे धंदे सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात काही महिन्यापुर्वी नुतन पोलीस अधिक्षक त्यानंतर काही दिवसांनी नुतन पोलीस उपमहानिरिक्षक हजर झाले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना बरेच दिवस गप्प बसावे लागले. पण आता अवैध धंदेवाल्यांनी आपले दंड थोपटले असून जागो-जागी दुकाने थाटली आहेत. काही ठिकाणी तर प्रवेश सुध्दा नियंत्रीत आहे.
नुतन पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे नांदेड पोलीस परिक्षेत्रात हजर झाल्यानंतर त्यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चार जिल्हयांमध्ये मला कोणताही अवैध धंदा नको आहे या विषयावर नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये विशेष पथके स्थापन करायला आदेश दिले. त्यानुसार चारही जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी वेगवेगळी पोलीस पथके स्थापन केली आणि त्या पथकांनी निवडणुकापर्यंत जवळपास 10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हजारो लोकांविरुध्द अवैध धंद्यांसाठी गुन्हे दाखल केले. त्यामुळे नंबर 2 चे काम करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला होता. कधी 2 नंबरवाल्यांची भेट झाली तरी ते कानावर हात ठेवून आम्ही सर्व काही बंद केले आहे असे सांगत होते. या परिस्थितीत 2 नंबरचा कारभार पुर्णपणे ठप्प झालेला होता.
आता निवडणुका संपल्या आहेत. शासन जेंव्हा स्थापीत होईल तेंव्हा होईल. पण निवडणुकांचा निकाल लागून आज तिसराच दिवस आहे. तरी नांदेड शहरातील बऱ्याच ठिकाणी मटका जुगार अड्डे सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी जुगारांच्या अड्‌ड्यांचा गुलाम पाडला जात आहे. अवैध रेती येतच आहे. गुटख्याची विक्री सुध्दा पुर्वीपेक्षा सहज झाली आहे. कोणाच्या आशिर्वादाने हे सुरू असेल. अद्याप तर नांदेड जिल्ह्याला पालकमंत्री सुध्दा भेटला नाही. तर नंबर 2 चे काम सुरू कसे झाले. हा विषय न कळणारे कोडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!