नांदेड (प्रतिनिधी)- मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी व हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी यावर्षी देखिल पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेला सैनिक हो तुमच्यासाठी…. या देशभक्तीपर गिताचा कार्यक्रम दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी प्रख्यात गायिका कल्याणी देशपांडे (अवघा रंग एक झाला….., स्टार प्रवाह-मी होणार सुपरस्टार फेम) या प्रमुख आकर्षण आहेत. महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत यात देशभक्तीपर गितांच्या रचना सादर करणार आहेत.
संवाद संस्था आणि नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यावर्षीचा हा ५७ वा प्रयोग आहे.
गेल्या सोळा वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने घेतला जात असून दरवर्षी नव्या कलावंताना संधी देतांनाच कार्यक्रमाची आखणी वेगवेगळ्या शैलीत केली जाते. कार्यक्रमाच्या आखणीबाबत संवाद प्रतिष्ठाणने योग्य नियोजन केले असून यावर्षी महाराष्ट्राची सुप्रसिध्द गायिका कल्याणी देशपांडे (अवघा रंग एक झाला….., स्टार प्रवाह-मी होणार सुपरस्टार फेम) हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असून, छत्रपती संभाजीनगर येथील प्रख्यात निवेदक सद्दाम शेख हे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमात गायक म्हणून मराठवाड्यातील गाजलेले कलावंत श्रीरंग चिंतेवार, पौर्णिमा कांबळे, स्वराज राठोड आणि शुभम कांबळे आदी कलावंत यात सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातला गाजलेला वाद्यवृंद हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक म्हणून प्रख्यात निवेदक अॅड.गजानन पिंपरखेडे व गझलकार बापू दासरी हे आहेत.
देशभक्तीपर गितांचा हा कार्यक्रम नांदेडच्या रसिक प्रेमींसाठी आणि देशभक्तांसाठी एक आगळीवेगळे पर्वणी असणार आहे.
देशभक्तीची भावना जागृत करणार्या या भावपुर्ण कार्यक्रमाला सर्व देशभक्तांनी, युवकांनी, नागरीकांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याचे संवाद संस्था व नांदेड जिल्हा पोलीस दलाने कळविले आहे.