मतदारांच्या कोणत्याही अडचणीला जलद प्रतिसाद देण्यासाठी पोलीस दल सज्ज-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील जनतेने अत्यंत निर्भिडपणे 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा पोट निवडणुक आणि विधानसभेच्या 9 मतदार संघामध्ये मतदान करावे. मतदारांना आलेल्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मी आणि माझे पोलीस दल पुर्ण ताकतीनिशी तयार आहोत असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अबिनाशकुमार बोलत होते. त्यांच्यासोबत अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक शामसुंदर टाक, जिल्हा विशेष शाखेतील सुरक्षा विभागाचे पोलीस निरिक्षक समाधान चवरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांची उपस्थिती होती.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुक मतदानामध्ये प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी सुरक्षा देणे पोलीस दलाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व पोलीस तयार असल्याची माहिती अबिनाशकुमार यांनी दिली. मतदारांना कोणतीही अडचण आली तर त्यांनी समोर दिसणाऱ्या पोलीसासोबत संपर्क साधावा आणि आपली अडचण सांगावी. मतदारांची अडचण दुर करण्यासाठी आम्ही पुर्ण ताकतीने तयार आहोत. कोणी भिती घालत असेल, कोणी मतदानाला जाऊ देत नसेल, कोणी मतदानासाठी आमिष दाखवत असेल या सर्व बाबींसाठी पोलीस दल मतदारांच्या हाकेला अत्यंत कमी वेळेत प्रतिसाद देणार आहे असा विश्र्वास अबिनाशकुमार यांनी व्यक्त केला. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस असेलच तसेच 30088 मतदान केंद्र 1995 जागी काम करणार आहेत. त्यासाठी 110 गाड्या अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. या वाहनांमध्ये तयार करण्यात आलेल्या 103 सेक्टरमध्ये पोलीस गस्त करत असतील. दर 15 ते 20 मिनिटाला पोलीसांची गाडी प्रत्येक मतदान केंद्रावर भेट देईलच. दरम्यान ती रस्त्यावर फिरत राहिल. या परिस्थितीमध्ये कोणत्याही मतदाराला आलेली अडचण ते कोणत्याही पोलीसाला सांगू शकतात आणि पोलीस त्याला अत्यंत जलदगतीने प्रतिसाद देईलच.
आपली तयारी सांगतांना अबिनाशकुमार यांनी मतदारांकडून सुध्दा काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ज्यामध्ये कोणत्याही मतदाराने आपले मोबाईल मतदान केंद्रात नेऊन त्यातून फोटो अथवा व्हिडीओ घेण्याची जोखीम घेवू नये. कारण चार महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 23 गुन्हे दाखल झाले. त्यातील 15 गुन्हे हे मोबाईल वापरामुळे झालेले आहेत. मतदान केंद्रापासून 100 मिटरपर्यंत मोबाईलसह वायरलेससेट, कॅमेरा, ज्वलनशिल पदार्थ, स्फोटक पदार्थ नेण्यास बंदी आहे. राजकीय पक्षांनी सुध्दा 100 मिटरच्या आत कोणती पोस्टर आणि बॅनर लावू नये. मतदानाच्या 100 मिटर परिसरात असलेली दुकाने, पानटपऱ्या व इतर आस्थापना बंद राहतील. त्रिकोणाप्रमाणे मतदान केंद्राबाहेर निवडणुक बुथ उभारण्यात येवू नयेत. या अपेक्षांसह पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जनतेला मतदान प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहन केले.
नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक -1, अपर पोलीस अधिक्षक-2, पोलीस उपअधिक्षक-10, पोलीस अधिकारी-200, पोलीस अंमलदार 2700, एनसीसी छात्र-151, एनएसएस छात्र-40, सेवानिवृत्त कर्मचारी-100 यांच्यासह तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड-2872 तसेच बाहेरून आलेले पोलीस उपअधिक्षक-2, सहाय्यक पोलीस निरिक्षक/ पोलीस निरिक्षक-25, पोलीस अंमलदार-452, प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार-400 एवढे संख्याबळ माझ्याककडे उपलब्ध आहे. सोबतच एसएसबी, एसएपी, बीएसएफ, सीआरपीएफ, एसआरपीएफ आदी शस्त्र दलातील 10 कंपन्या अर्थात जवळ 1000 व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील निवडणुकीला शांततेत पार पाडण्यासाठी उपलब्ध आहे.
निवडणुकीच्या कालखंडात 30 दिवसांमध्ये 12-12 तास काम करून जिल्हा विशेष शाखेतील व्हीआपी सुरक्षाचे पोलीस निरिक्षक यांनी तयार केलेल्या बंदोबस्त स्किम आणि त्यामुळेच पोलीस दलाने त्यांना दिलेला प्रतिसाद अत्यंत उत्कृष्ट राहिला आणि कोणत्याही व्हीव्हीआयपी बंदोबस्तामध्ये कोणतीही अडचण आली नाही. त्याबद्दल मी माझ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचे कौतुक करतो असे सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर दारु, गुटखा, हत्यार कायद्या, वाहन, इतर अशा एकूण 15 कार्यवाह्यांमध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 2200 पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आणि 1400 जामीन पात्र आणि अजामीनपात्र वॉरंट तामील करण्यात आले ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!