नांदेड(प्रतिनिधी)-बीअर बार फोडून चोरट्यांनी 1 लाख 48 हजार 260 रुपयांचा ऐवज दारुसह चोरून नेला आहे. ही घटना मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. विसावानगर भागात एका महिलेचे सोन्याचे गंठण 80 हजार रुपये किंमतीचे दोन चोरट्यांनी तोडून पळ काढला आहे. ही घटना पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या हद्दीत घडली आहे. तिसऱ्या एका घटनेत नागठाणा ता.उमराी येथे एका व्यक्तीला पळवून नेऊन त्याच्याकडून 68 हजार रुपयांचा ऐवज दोन जणांनी बळजबरीने चोरुन नेला आहे.
पारोजी मारोतराव मस्के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 नोव्हेंबरच्या रात्री 12 ते 14 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेदरम्यान बामणी शिवारात असलेल्या प्रथम बार ऍन्ड रेस्टॉरंटचे मागील बाजूचा किचनचा दरवाजा तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला. विविध कंपन्यांच्या दारुच्या बाटल्या, सीसीटीव्ही कॅमेरा, व्हीडीआर आणि नादुरूस्त टी.व्ही. असा 1 लाख 48 हजार 260 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मनाठा पोलीसांनी या घटनेला गुन्हा क्रमांक 193/2024 प्रमाणे दाखल केले आहे. मनाठ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे अधिक तपास करीत आहेत.
स्वाती साईप्रसाद चौडारपवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या विसावानगर भागात राहतात. 14 नोव्हेंबरच्या सकाळी 9.15 वाजता मुख्य रस्त्यावरून भाजीपाला घेवून परत घराकडे जात असतांना दुचाकीवर आलेल्या तिन जणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चैन, मनीमंगळसुत्र असा 80 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून पळून गेले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 465/2024 नुसार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक किशोर गावंडे हे करीत आहेत.
समीर मुस्तफा शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते चोंडी ता.मुखेड येथील रहिवासी आहेत. 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता नागठाणा (बु) ता.उमरी येथे सोहेल नबीसाब शेख, नबीसाब राजेसाब शेख दोघे रा.चोंडी ता.मुखेड आणि शेख मौला रा.हळणी ता.मुखेड या तिघांनी आपल्यातील भांडण मिटवायचे आहे म्हणून जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवून मारहाण केली, सोबत नेत असतांना शिवीगाळ केली. चाकूने उजव्या हातावर मारुन दुखापत केली आणि गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व रोख रक्कम 8500 रुपये असा 68 हजार 500 रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला आहे. उमरी पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 378/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार जाधव हे करीत आहेत.