नांदेड(प्रतिनिधी)-सिंदखेड पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून खून करून आलेल्या तीन जणांना पकडण्याची उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. या तिघांनी अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 35 वर्षीय व्यक्तीचा खून केला होता.
बीडचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी नांदेड पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हद्दीतील मौजे डोंगर पिंपळा ता.अंबाजोगाई जि.बीड येथे काही जणांनी सचिन शिवाजी तिडके (35) याचा ऊस तोडीच्या व्यवहारातून खून केला आहे. सचिन तिडकेला दारु पाजून त्याचे तोंड दगडाने ठेचण्यात आले आहे. या बद्दल अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. मारेकरी मंडळी नांदेड जिल्ह्यात असल्याची माहिती बारगळ यांनी सांगितली.
गुन्हेगार पकडण्यासाठी अबिनाशकुमार यांनी सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांना माहिती दिली. तेंव्हा त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरिक्षक मडावी, पोलीस अंमलदार पठाण, मडावी, हुसेन आणि शेंडे यांना ही कामगिरी यशस्वी करण्यास सांगितले. तेंव्हा सिंदखेड पोलीसांना माहिती मिळाली की, हे तीन खून करणारे आरोपी ऍटोतून जात आहेत. तेंव्हा त्यांचा पाठलाग करण्यात आला. पलाईगुडा गावाजवळ ऍटोसोडून मारेकरी पळाले. तेंव्हा पोलीसांनी त्यांचा चार किलो मिटर पायी पाठलाग केला. अखेर पोलीसांनी त्यांना गाठलेच आणि त्यांना जेरबंद केले.
मारेकरी यांची नावे यमराज धर्मसिंग राठोड(32) रा.लसनवाडी ता.माहुर, शुभम चंद्रकांत पवार (20) रा.सिडको, करण देविदास राठोड(22) रा.नमस्कार चौक नांदेड अशी आहेत. या मारेकऱ्यांनी 29-30 ऑक्टोबरच्या रात्री मौजे डोंगरा पिंपळा येथे सचिन तिडकेच्या सासुरवाडीत त्याचा खून केला होता. त्या संदर्भाने गुन्हा क्रमांक 327/2024 दाखल आहे. आरोपींना पकडल्यानंतर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी बीडचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना ही माहिती दिली. तेंव्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेंद्र घुगे, पोलीस अंमलदार भागवत, राऊत, कोकाटे आदी सिंदखेड येथे आले आणि तिन्ही मारेकऱ्यांना आपल्या ताब्यात घेतले.