नांदेड(प्रतिनिधी)-यंदाच्या वर्षीची दिवाळी आपल्याला विनाबंदोबस्त साजरी करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि जीवनात आनंद आपणही घ्या आणि कुटूंबियांना सुध्दा द्या असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले.
पोलीस विभागातील विहित सेवाकाळाप्रमाणे नांदेड जिल्हा पोलीस दलातून आज एक चालक पोलीस उपनिरिक्षक आणि चार श्रेणी पोलीस उपनिरिक्षक असे पाच पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाले. पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात त्यंाचा सहकुटूंब सन्मान करतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार बोलत होते. आज सेवानिवृत्त झालेले चालक पोलीस उपनिरिक्षक पपिंदरसिंघ शोभासिंघ संधू-मोटार परिवहन विभाग, श्रेणी पोलीस उपनिरिक्षक पंडीत मारोती गिते-पोलीस ठाणे मांडवी, मिलिंद वामनराव देवणे-पोलीस मुख्यालय, त्रिलोकसिंघ सोहल आणि ज्ञानेश्र्वर नारायण मद्रेवार-पोलीस नियंत्रण कक्ष आणि प्रकाश तुकाराम पवार-पोलीस ठाणे अर्धापूर हे पाच पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाले. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांच्या कुटूंबासह त्यांचा सन्मान करत त्यांना निरोप दिला.
याप्रसंगी पुढे बोलतांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार म्हणाले, आपला सेवानिवृत्तीचा दिनांक आणि दिवाळी ही सोबत आल्यामुळे आपल्या सर्वांना विनाबंदोबस्त ही दिवाळी साजरी करता येणार आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचा भरपूर उपयोग घेत दिवाळी साजरी करा. आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपले आरोग्य आणि कुटूंब यांच्यासाठी सुध्दा वेळ द्या जेणे करून आपली शारिरीक क्षमता कायम राहिल आणि कौटूंबिक जीवन सुखी राहिल. याप्रसंगी अबिनाशकुमार म्हणाले मला अधिकार असते तर मी आपल्याला विधानसभेची मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर सोडले असते. कारण माझ्या जिल्हा पोलीस दलातील पाच लोकांची कमतरता मला भासणार आहे. पण असे शक्य नाही. तरी पण आपल्या मदतीची गरज वाटली तर आपल्याला आम्ही बोलावू आणि तुमच्या जीवनात काही समस्या आली तर ती सोडविण्यासाठी सुध्दा मी आणि माझे जिल्हा पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी उभे राहिल अशा शुभकामनाा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळासाहेब नरवटे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन पोलीस कल्याण विभागातील पोलीस अंमलदार सविता भिमलवाड यांनी केले.