फटाके उडवताना कायदा पाळा.. 

कायदा आणि सुव्यवस्था समाजाच्या शांततेसाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक घटक आहेत. एक सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे, आणि याचसाठी मुलांना बालपणापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करायला शिकवणे फार महत्वाचे ठरते. हा विषय दिवाळी निमित्त उडवील्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे उपस्थित झाला आहे.

मुलांवर बालपणातच घडवलेले संस्कार त्यांचे जीवन घडवण्यास मदत करतात. त्यांना कायद्याचे महत्त्व समजले तर मोठेपणीही ते नियमांचे पालन करतील, सामाजिक कर्तव्याबद्दल जागरूक राहतील, आणि स्वतःच्या हक्कांबरोबर इतरांच्या हक्कांचा आदर करतील. उदाहरणार्थ, जर मुलांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय लावली, तर ते मोठेपणीही सुरक्षिततेचे नियम पाळतील आणि अपघात टाळतील.
केळीचे साल किंवा चॉकलेटची आवरणे रस्त्यावर टाकायचे नाही. ही छोटीशी गोष्ट मुलांना पालकांनी समजावयाला हवी तर आपला भारत किती स्वच्छ होईल?

सामाजिक सुव्यवस्था राखणाऱ्या लोकांचा आदर करणे हे सर्वांसाठी अनिवार्य आहे.
मुलांना कायद्याचा आदर करण्याचे महत्त्व समजावले की, त्यांच्यात शिस्त, इतरांसाठी आदर, आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विकसित होते. अशा संस्कारांमुळे ते फक्त चांगले नागरिकच बनत नाहीत, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढे येतात. कायदा मोडणे केवळ चुकीचे नसून त्याचा परिणाम समाजावरही होतो, हे त्यांना समजणे आवश्यक आहे.

म्हणूनच, कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करणे हे केवळ प्रौढांसाठीच नव्हे, तर मुलांसाठीही महत्त्वाचे आहे. प्रत्येक पालक आणि शिक्षकांनी मुलांना कायदा पाळण्याचे महत्त्व शिकवून त्यांच्यात सजगता निर्माण करावी. अशा प्रकारे, आपला समाज अधिक सुरक्षित, सुसंस्कृत आणि शांतीपूर्ण होऊ शकतो.

समाजात काही व्यक्ती कायद्याचे उल्लंघन करतात, ज्यामुळे अनागोंदी माजू शकते. अशा स्थितीत प्रशासनावर भार येतो, आणि संसाधनांचा अपव्यय होतो. पोलिसांच्या कडक वागण्याची निंदा करायला सगळे अगदी सजग असतात, पण जर पोलिसांच्या समोर सकाळी ५ वाजता, त्याच्या आज्ञेची आणि शेजाऱ्यांच्या केलेल्या विनंतीचा अनादर करून लहान मुले फटाके उडवणार असतील तर अश्या मुलांना मोठे होऊन पोलिसांच्या काठ्या पडल्या तर पालकांना तक्रार किंवा निंदा करायचा अधिकार नाही.

सध्या दिवाळी पर्व सुरूं आहे.मला सुद्धा दिवाळी माहीतच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणे हा अधिकार आहेच. पण त्यासाठी सुद्धा कायदे आहेत.कधी उडवावे फटाके,त्यात कोणते केमिकल नसावे,त्यामुळे होणार आवाज किती डेसिबल असावा,त्यामुळे प्रदूषण होणार नाही याची खात्री असावी.पण कोणीही या कायद्याना जुमानत नाहीच.उलट आमचा धार्मिक हक्क आहे अशी ओरड करून वेगळाच रंग दिला जातो.अनेक घरांमध्ये लहान लहान बालके असतात,वृद्ध व्यक्ती असतात, पशु असतात, त्याच्यावर या फटाक्यांच्या आवाजाने होणारे वाईट परिणाम किती आहेत. कोण आहे जबाबदार याला.आणि कायद्याचा प्रश्न आलाच तर पोलीस आपल्या अनेक युक्त्या प्रयुक्त्या वापरतात आणि मग आपल्या बालकांना कायद्याच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक दिव्य पालकांना करावी लागतात.अनेक पशु पक्षी या आवाजांनी आणि फटाक्यांच्या धक्का लागल्याने मरतात आणि त्यांच्यावर सुद्धा अनेक दुष्परिणाम होतात, त्यासाठी वेगळे कायदे आहेत.पण ते सुद्धा पूर्णपणे अंमलात आणले जात नाहीत.
या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे आणि आपली भूमिका जबाबदारीने पार पाडणे आवश्यक आहे.

म्हणूनच, मुलांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर निर्माण करणे ही आजच्या समाजाची अपरिहार्य गरज आहे. त्यांच्यात योग्य संस्कार रुजवले तर ते भविष्याचे जबाबदार नागरिक बनतील, आणि एक समृद्ध, शांततापूर्ण समाज उभारणीसाठी योगदान देतील. ज्या समाजात कायद्याचा सन्मान आहे, तेथेच खऱ्या अर्थाने सुरक्षितता, विकास, आणि सलोखा नांदतो. प्रत्येकाने या उद्दिष्टासाठी कटीबद्ध होणे आवश्यक आहे, कारण आजची ही पिढीच आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणार आहे.

– कल्याणी रामप्रसाद खंडेलवाल 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!