हिंगोली(प्रतिनिधी)-7/12 उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणी करून ती लाच खाजगी व्यक्तीकडे देण्यास सांगणाऱ्या तलाठ्याला आणि त्या खाजगी व्यक्तीला अटक केल्यानंतर हिंगोली न्यायालयाने त्या दोघांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एका तक्रारदाराने 28 ऑक्टोबर रोजी तक्रार दिली की, त्यांनी हिंगोली येथील शेत गट क्रमांक 96 मधील भुखंड क्रमांक 18/1 नोंदणी दस्त क्रमांक 719/2010 अन्वये खरेदी केलेला आहे. सध्या खरेदी केलेले भुखंड 7/12 वर नोंद घेणे आवश्यक आहे. तक्रारदाराला तो भुखंड विक्री करायचा होता. त्यांनी 16 फेबु्रवारी 2024 रोजी तलाठी सज्जा बळसोंड कार्यालय येथे अर्ज दाखल केला. आपले काम होत नाही म्हणून तक्रारदाराने 1 जुलै 2024 रोजी तहसील कार्यालय हिंगोली व उपविभागीय अधिकारी हिंगोली यांना तक्रार केली. उपविभागीय अधिकारी हिंगोली यांनी 1 ऑक्टोबर 2024 रोजी तलाठी सज्जा बळसोंड यांना आदेश दिला की, तक्रारदाराच्या अर्जाप्रमाणे त्यांची नोंद 7/12 उताऱ्यावर घेण्यात यावी.
25 ऑक्टोबर 2024 रोजी तक्रारदार तलाठी कार्यालय बळसोंड येथे गेले तेंव्हा तेथे कार्यरत तलाठी विजय भागवत सोमटकर (42) यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रार देण्यात आली.28 ऑक्टोबर रोजी या लाच मागणीची पडताळणी झाली. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तलाठी सोमटकरने ती लाचेची 50 हजार रुपये रक्कम जयवंतराव कृष्णराव देशमुख (59) रा.बळसोंड यांच्याकडे देण्यास सांगितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्या दोघांना ताब्यात घेवून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात या संदर्भाने गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक विकास धनवट, पोलीस निरिक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विनायक जाधव, पोलीस अंमलदार मोहम्मद युनूस, विजय शुक्ला, तानाजी मुंडे, रविंद्र वरणे, ज्ञानेश्र्वर पचलिंगे, राजाराम फुफाटे, भगवान मंडलीकर, गोविंद शिंदे, गजानन पवार, शेख अकबर, योगिता आवचाट आणि शिवाजी वाघ यांनी ही कार्यवाही पुर्ण केली. पकडलेल्या दोन लाचखोरांना हिंगोली न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.