जोहार मायबाप जोहार ! तिकीट देता काय तिकीट ? जोहार मायबाप, पाय लागो सरकार, तिकीट देता काय तिकीट ? माझ्या जातीच्या नावाने तिकीट द्या, माझ्या धर्माच्या नावाने तिकीट द्या, माझ्या कर्माच्या नावाने तिकीट द्या, माझ्या नावाच्या नावाने तिकीट द्या ! अशी तिकीटमाग्यांची फौज जवळपास सर्वच मतदार संघात सध्या सक्रीय झाली आहे !
रोज एका राजकीय पुढाऱ्यांच्या दारात जाऊन तिकीट द्या मायबाप तिकीट द्या ! मी आपल्या पक्षाचा फारच निष्ठावान कार्यकर्ता आहे. माझ्यासारखा ईमानदार दुसरा कुणीही शोधूनही सापडणार नाही. हा पहा माझा बायोडाटा, हे फोटो पहा, हा कॅटलाॅग पहा, मी किती जुना व सक्रीय कार्यकर्ता आहे, हा पहा माझा चड्डीतला फोटो, आहे की नाही मी निष्ठावान ? लहानपणापासून शेंबूड ओढत होतो तेंव्हापासून मी आपलाच कार्यकर्ता आहे.
जो काम करतो, जो रोज जनतेत राहतो, त्याला असे बायोडाटा घेऊन दारोदार भटकावे लागत नाही, तिकीट द्या तिकीट अशी हाळी कुणापुढेही ठोकावी लागत नाही. अशा लोकांची जनता स्वतः होऊन शिफारस करीत असते. अशा लोकांची पक्ष श्रेष्ठींकडे आपोआप नोंद होत असते व त्या आधारावर त्यांना त्या त्या पक्षाचे तिकीट विनासायास मिळत असते. पण कांहीनी पक्षात कांहीही कार्य न करता माझ्याच धर्माच्या व्यक्तीला म्हणजे मलाच तिकीट मिळाले पाहिजे याचा जणू अट्टाहासच धरला आहे.
बिलोली तालुक्यातील एक सेवानिवृत कर्मचारी हे मुंबईला स्थायिक झाले आहेत. कधी समाजात मिसळले नाहित. समाजाच्या सुखदुःखात धाऊन आले नाहित. समाजाच्या सामाजिक चळवळीत सहभागी झाले नाहित. या चळवळींना कधी पाच पैशाची मदत केली नाही. स्वतःला उच्चवर्णीय समजून मागास समाजात मिसळण्याचा प्रयत्न केला नाही. आपली उठबैस कथित उच्चवर्णीय सनातनी लोकांत ठेवली. कुणा गरजूचा कधी फोन घेतला नाही की भेटल्यावर कधी कुणाला आपुलकीने बोलले नाही. कधी जमिनीवर पाय टेकले नाहीत. मंत्र्याचा पीए झाल्यापासून त्यांच्या डोक्यात राजकारणाची हवा भरली. आता त्यांनाही मंत्रीपदाचे स्वप्न पडत नसतील तर नवलच ! त्यासाठी अगोदर आमदार व्हावे लागते.
सेवानिवृती नंतर यांना समाज आठऊ लागला. मी खूप समाजसेवा केली अशा पुड्या ते चावडीवर सोडू लागले. फलाण्या समाजसेवकाला मीच मोठा केलो, मीच पैसा दिला अशा वावड्या ते सध्या उठऊ लागले आहेत. हा फेकू पाच दिवस मुंबईत राहिल्यानंतर शनिवार रविवारी तो देगलूर बिलोलीला चकरा मारु लागतो. मोठी कार घेऊन बेकार भाऊ, मावसभाऊ, नातेवाईक यांना सोबत घेऊन सध्या भावी आमदारकीच्या तोऱ्यात ते गरागरा फिरु लागले आहेत. कधी उष्ट्या हाताने कावळाही न हाकाललेला हा नवोदित पुढारी चार पैसे खर्च करु लागला. पत्रकारांना हाताशी धरुन बातम्या छापून आणू लागला. जयंत्या, सप्ताह आणि भंडारे प्रायोजित करु लागला.
भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून सुरुवातीला मोठमोठे पुष्पगुच्छ घेऊन खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यक्रमात ते मिरऊ लागले. तिकीट देता का तिकीट अशी चाचपणी करु लागले. तिथे आधीच सुभाष साबने असल्याने याला कुणी भाव देईना म्हणून हा महादेव जानकर यांच्या नादाला लागला. रासपाची उमेदवारी घ्यावी असे त्याला वाटू लागले. तिथेही स्थीर न राहता त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबईत प्रवेश केला. गावाकडे प्रवेश केला असता तर चार लोकांना कळले तरी असते.
विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर हे भाजपात गेल्याने ही जागा अशोक चव्हाण भाजपाला सोडून घेतील. भाजप सेनेची युती असल्याने शिवसेना येथे लढणार नाही, मग या नवोदित अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या उमेदवाराने आता तिकीट देता का तिकीट हा सूर लावणे बंद केल्याचे दिसून येत आहे. कांही झाले तरी आपण अपक्ष म्हणून लढवणार असे आता ते बोलत आहेत. त्यांना कुणी तरी सुचवले की मायावती तुझ्या जातीची आहे, त्या तुला तिकीट देतील ! लखनौला जाऊन ये एकदाचे !
नाही नाही ! मी बहुजन नाही, सर्व समाजाचा आहे. मला सगळेच मतदान करणार आहेत. मी बसपाचे तिकीट घेणार नाही. वाटल्यास त्यांनी मला बाहेरुन पाठिंबा द्यावा ! हा कोण लाटसाहेब लागून गेला ? बसपा हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय मान्यता प्राप्त राजकीय पक्ष आहे. हा पक्ष कोणालाही बाहेरुन पाठिंबा देत नाही. सर्वजण हिताय अशी या पक्षाची विचारसरणी आहे. सवर्ण जातीचे लोक देखिल बसपाचे तिकीट घेऊन निवडणूक लढवितात आणि निवडूनही येतात पण महाराष्ट्रातील मागासवर्गीय हे स्वतःला उच्चवर्णीय समजून आपली फसगत करुन घेत असतात. त्यातल्या त्यात जरा गोरेगोमटे दिसणारे चांभार तर स्वतःला ब्राम्हणाचेच वारस समजतात.
ही झाली अनुसूचित जातींमधील चांभार जातीची कथा. मातंग जातीचेही भरपूर उमेदवार देगलूर बिलोलीतून लढविण्यास उत्सूक आहेत. त्यात जितेश अंतापूरकर, अविनाश घाटे, व्ही. जे. वरवंटकर आदिंचा समावेश आहे. जितेशचे वडील आमदार होते. जितेशही कालपरवा पर्यंत आमदार होते. अविनाश घाटे आमदार होते आणि त्यांचे वडिलही आमदार व मंत्री होते. आता यांना पुन्हा आमदार व्हायचे आहे म्हणून ईकडून तिकडे कोलांटउड्या मारणे चालू झाले आहे. काँग्रेसमधून ते भाजपात गेले आणि आता परत भाजपातून काँग्रेसमध्ये त्यांनी घरवापसी केली आहे. तिकीट देता का तिकीट अशी आळवणी त्यांनी भास्कर पाटलांकडे केली आहे. सुरेशदादा गायकवाड यांचे समर्थकही भास्कररावांवर दबाव आणित आहेत. तिकीट द्या तिकीट असा राग ते आळवित आहेत.
अनु. जातीमधील ढोर जातीचे सुभाष साबने आणि त्यांचे वडिल पिराजी साबने हे ही आमदार होते. एवढ्यावर त्यांचे समाधान झालेले दिसत नाही म्हणून शिवसेनेतून भाजपात आणि भाजपातून परिवर्तन महाशक्ती आघाडीत त्यांनी उडी मारली आहे. अगोदर मुखेड मतदार संघ आणि नंतर देगलूर बिलोली अशी आमदारकी त्यांनी उपभोगली पण या दोन्ही मतदार संघाचा फारसा विकास ते करु शकले नाहित तर पुन्हा त्यांना कशासाठी निवडून द्यायचे ? असा प्रश्न जनतेला पडणे साहजिक आहे. त्यांचे वाळू घोटाळे सर्वश्रूत आहेत.
आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेशदादा गायकवाड हे मूळचे नायगाव तालुक्यांतील देगावचे रहिवासी, सध्या नांदेडला स्थायिक झाले आहेत. त्यांनी उत्तर नांदेडमधून विधानसभा निवडणूकही लढवली आहे. दैनिक शिल्पकार नावाचे वृतपत्रही त्यांनी कांही काळ चालविले. त्यांचा स्वतःचा राजकीय पक्ष असतानाही त्यांनी पूर्ण ताकतीनिशी आपला पक्ष न वाढविता दुसऱ्यांच्या पक्षात जाऊन आपले नशीब आजमावण्याचा आजवर प्रयत्न करुन पाहिला. भारिप बहुजन महासंघाचे ते मोठे नेते होते. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे जमू शकले नाही. बहन मायावती यांच्या बहुजन समाज पक्षातही त्यांनी काम करुन पाहिले. नांदेडच्या महानगर पालिका निवडणुकीत महापौरपदासाठी त्यांनी प्रतापराव पाटलांच्या माध्यमातून भाजपाशीही घरोबा केला होता. त्यामुळे त्यांचा आंबेडकरी बेस खिळखिळा झाला. कट्टर आंबेडकरी कार्यकर्ते दुरावले.
कुठेच कांही यश न मिळाल्याने दादांनी अखेर नजिकच्या तेलंगणामधील बीआरएस (भारत राष्ट्र समिती) या पक्षाची गुलाबी दस्ती गळ्यात टाकली. ही दस्ती नांदेड जिल्ह्यात बरीच फिरली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मोठमोठ्या सभा नांदेड शहर व परिसरात संपन्न झाल्या. मोठमोठे मेळावे यशस्वी झाले. यावर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला. सर्वत्र मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले. खेडोपाडी वालपेंटिंग करण्यात आली. अब की बार किसान सरकारचे बॅनर्स गावोगावी झळकले.
हा सारा ताकझाम पाहून शेतकरी संघटनेचे नेते व नंतर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार झालेले कंधारचे शंकरअण्णा धोंडगे यांनीही पूर्ण ताकतीनिशी बीआरएस मध्ये प्रवेश करुन तो वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सुरेशदादा यांनी तर बीआरएस पक्षाची देगलूरमधून उमेदवारीही जाहिर केली होती. गळ्यात गुलाबी दस्ती घालून त्यांनी मतदार संघ ढवळून काढला. बीआरएसच्या धनशक्तीच्या जोरावर आपण आमदारकीची नौका सहज पार करुन जाऊ असा विश्वास त्यांना वाटत होता पण तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत तेथील टीआरएसची काँग्रेस पक्षाने पुरती वाट लावली आणि बीआरएस कोमात गेला. या पक्षाची एकदम बत्तीच गुल झाली. तेलंगणाच्या जनतेचा पैसा महाराष्ट्रात खर्च केला जात आहे असा प्रचार करुन काँग्रेसने तेलंगणा राष्ट्र समितीची पार हवा काढून टाकली.
ज्या काँग्रेस पक्षाने बीआरएस पक्षाची वाट लावली त्याच काँग्रेस पक्षाचे आपण पैदाईशी सभासद असल्यागत आता ९० देगलूर बिलोली अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघात काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी सुरेशदादा गायकवाड यांनी जमिन आसमान एक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाल्याने आता आपणाला काँग्रेसशिवाय कुणीही तारु शकणार नाही याचा साक्षात्कार झाल्याने की काय ते काँग्रेस पक्ष श्रेष्ठींवर हर एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता तर ते चक्क जातीवर उतरले आहेत. विश्व कल्याणकारी आंबेडकरवाद त्यांनी त्यांच्या एका जातीवर आणून ठेवला. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेचे तत्व पायदळी तुडऊन बौद्ध उमेदवाराला म्हणजे फक्त मलाच तिकीट द्या असा राग ते आळवू लागले आहेत.
अठरापगड बहुजन समाजाच्या कल्याणाची भाषा करणाऱ्या सुरेशदादा गायकवाड यांनी घायकुतीला येऊन चक्क आपल्या जातीचा आणि धर्माचा आधार घेतला आहे. त्यांचा प्रखर आंबेडकरवाद केवळ त्यांच्या जाती धर्मात येऊन अडकून पडला आहे. काँग्रेसने बौद्ध जातीला म्हणजे त्यांना उमेदवारी द्यावी नसता असे करु तसे करु अशी धमकी द्यायला त्यांच्या समर्थकांनी सुरुवात केली आहे. तशा बातम्याही प्रकाशित झाल्या आहेत. धमकी देऊन तिकीट मागण्याची ही कुठली पद्धत आहे ? या धमकीला काँग्रेसने का भीक घालावी ? तुमचे आताच हे तेवर असतील तर उद्या आमदार झाल्यावर आणखी किती धमक्या द्याल याचा काँग्रेस पक्ष गांभीर्याने विचार करणारच ना !
रोज शिष्टमंडळे घेऊन काँग्रेसच्या नेत्यांना भेटायचे, वर्तमानपत्रात बातम्या छापून आणायच्या, बौद्धालाच म्हणजे मलाच तिकीट द्या, मीच बौद्ध आहे, मलाच तिकीट द्या, नसता बघा… असे म्हणायचे असा पोरखेळ सध्या येथे चालू आहे. तिकीट मागणारे सुरेशदादा हे एकटेच बौद्ध नाहित तर खुद्द काँग्रेस पक्षात एक डझनहून अधिक बौद्ध समाजाचे क्रीयाशिल नेते व कार्यकर्ते आहेत. त्यांचाही विचार काँग्रेस पक्ष करीलच ना ! ते देखिल भेटतच आहेत पक्ष श्रेष्ठींना. त्यात निवृती कांबळे, गंगाधर सोंडारे, डाॅ. निखाते, गंगाधर सोनकांबळे, उत्तम कांबळे असे गब्बर प्रतिस्पर्धी आहेत.
अशा परिस्थितीत मलाच तिकीट द्या या दबावतंत्राचा वापर का करायचा ? तुम्हाला बौद्ध व्यक्तीलाच आमदार झालेले पहायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीने बौद्ध व्यक्तीलाच आपले तिकीट जाहिर केले आहे, त्यांच्या मागे सारे संभाव्य बौद्ध उमेदवार ताकत लावतील काय ? नाही, तसे नाही ! काँग्रेसने बौद्ध व्यक्तीला म्हणजे सुरेशदादा गायकवाड यांनाच तिकीट द्यावे हा अट्टाहास हास्यास्पद आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस हे जळते घर आहे असे म्हटले होते याचा सोयीस्कर विसर अशा कथित आंबेडकरी नेत्यांना पडलेला दिसतो. नसेल देत काँग्रेस तर दुसरे आंबेडकरी पक्ष आहेतच ना ! वंचित बहुजन आघाडी आहे, बहुजन समाज पक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (असंख्य गट) आहेत, पिपल्स रिपब्लिकन पार्टी आहे, रिपब्लिकन सेना आहे, आझाद समाज पार्टी आहे, बहुजन मुक्ती पार्टी आहे, बहुजन भारत पार्टी आहे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया आहे. हे ही जमत नसेल तर त्यांची स्वतःची संविधान पार्टी आहे.
तुम्ही खूप मोठे आंबेडकरी नेते आहात, तुमची खूप ताकत आहे तर जाॅईन करा एखादा आंबेडकरी पक्ष आणि लावा ताकत विधानसभेला ! कशाला भीक मागता मनूवादी पक्षांना ? काँग्रेस भाजप सेना हे सारे आरक्षण विरोधी, संविधान विरोधी ! कुणी नागनाथ आहे तर कुणी सापनाथ ! कट्टर आंबेडकरी अनुयायांनी कशाला या विषवेलींना खतपाणी घालायचे ? समदु:खी ओबीसी व मुसलमानांना सोबत घेऊन आंबेडकरी म्हणजे मानवतावादी व समतावादी विचारसरणीची पेरणी करता येणार नाही काय ?
हे आम्ही सुभाष साबने यांना सांगू शकत नाही. ते शिवसेनेत वाढले. दोन वेळा आमदार झाले. नंतर भाजपात गेले. भाजपने त्यांना सध्या तिकीट नाकारले. मग आता ते राजू शेट्टीच्या परिवर्तन आघाडीत गेले. ज्यांना निश्चित विचारसरणी नाही ते कुणीकडेही उड्या मारु शकतात पण जाज्वल्य आंबेडकरवादी म्हणऊन घेणाऱ्यांनी एका आमदारकीच्या सामान्य तिकीटासाठी प्रस्थापितांच्या पायांवर एवढे लोटांगण कशासाठी घालायचे ? तिकीट देता का तिकीट ? असा टाहो का फोडायचा ? आंबेडकरी विचारांवरील विश्वास उडाल्याने गांधीवाद्यांपुढे असे लोटांगण घालण्याची वेळ येते. यातच आपल्यातील कार्यकर्ता मरुन गेलेला असतो !
जाता जाता एक खंत व्यक्त करावी वाटते. सारे प्रस्थापित राजकीय पक्ष युती आणि आघाडी करुन लढत आहेत व सत्ता मिळवित आहेत. सारे आंबेडकरवादी पक्ष मात्र एकटे एकटे स्वतंत्र लढत आहे. यांच्याकडे परिवर्तनवादी विचारधारा आहे पण एकजूट नाही, म्हणूनच तर दारोदर फिरुन म्हणावे लागते की, दे दाता के नाम तुझको अल्ला रखे….तिकीट देता काय तिकीट ?
– इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
नांदेड. मो. 855 499 53 20