नांदेड(प्रतिनिधी)- अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याची पोलीस विभाग तयारी करत असतांना एका अवैध वाळु टिपरच्या धडकेत पाच वर्षाच्या बालकाचा जिव गेला आहे. फक्त कागदोपत्री गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षात या कार्यवाहीला अत्यंत प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.
काल दि.22 ऑक्टोबर रोजी आसरानगर भागातील रॉयल रोज फंक्शन हॉलसमोर, शिवरोडवर एक भरधाव वेगातील टिपरने एक पाच वर्षाचा बालक हरीश अजीम यास जोरदारपणे धडक दिली. या धडकेत हा बालक जागीच मरण पावला. या कुटूंबावर तिन दिवसात निसर्गाचा हा दुसरा आघात आहे. तिन दिवसांपुर्वी हरीशचे वडील गोदावरी नदी पोहण्यासाठी गेले असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहुन गेले. तीन दिवसानंतर अर्थात 22 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यदेह तेलंगणा राज्यातील देवापुर येथे सापडला.एकीकडे वडीलांचा मृतदेह सापडला आणि दुसरीकडे त्यांच्या पाच वर्षाच्या बालकाला टिपरने धडक दिल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. या टिपरवर एम.एच.04 जी.आर.6226 असा क्रमांक टायर जवळ असणाऱ्या पाटीवर लिहिलेला आहे. हा नंबर टिपरच्या चारही बाजुने लिहावा लागतो. त्यातील टिपरच्या मागच्या बाजूचे चित्र पाहिले असता जीआर नंतर लिहिलेले 6326 हे आकडे मिटवलेले आहेत. अर्थात हा टिपर सुध्दा मोटार वाहन कायद्यानुसार रजिस्टर नाही. प्रत्यक्षदर्शी सांगत होते की, वाळु भरलेले नव्हती पण हा टिपर वाळूच वाहतुक करतो.
अवैध धंदे समुळ नष्ट करण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली असली तरी रस्त्यावर जाता-येतांना त्यांनी आपल्या चार चाकी वाहनातून नजर फिरवली तर अनेक ठिकाणी आजच आणून टाकलेले वाळूचे ढिगार दिसतात. मग ही वाळू कुठून येत आहे. याची कोणी तपासणी केली काय? करायला हवी तरच चुकीच्या मार्गाने येणाऱ्या, शासनाचा महसुल बुडवणाऱ्या वाळु माफियांचा पडदा उघडकीस येईल. अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन नक्कीच झाले पाहिजे परंतू ही कार्यवाही फक्त कागदोपत्री नसावी तर प्रत्यक्षात यावी अशी अपेक्षा आहे.