नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारुचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आता पोलीस दल आणि राज्य उत्पन्न शुल्क विभाग संयुक्त पणे कार्यवाही करणार या संदर्भाची एक बैठक पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात पार पडली. यामध्ये पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप आणि राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार अवैधरित्या उत्पादीत केली जाणारी गावठी दारु, त्याचप्रमाणे बनावट दारु आणि दुसऱ्या राज्यातून कर बुडवून येणाऱ्या देशी व विदेशी दारु विरुध्द पोलीस विभाग आणि राज्य उत्पन्न शुल्क विभाग संयुक्तपणे कार्यवाही करणार आहे. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 2 महिन्यात गावठी दारुचे उत्पन्न रोखण्यासाठी पाच मासरेड आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या 1034 खटले दाखल करण्यात आले आणि 59 लाख 69 हजार 519 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सिमेवर चार संयुक्त तपासणी नाके उभारले आहेत. या नाक्यांवर परराज्यातून अवैधपणे व कर बुडवून येणारी दारु रोखली जाईल. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर निवडणुक प्रक्रिया प्रलोभन विरहित होण्याकरीता हात भट्टी गाळप करणारी ठिकाणे, बनावट दारु बनविणारे अड्डे आणि परराज्यातून कर बुडवून महाराष्ट्रात दारु आणणारे माफिया यांच्याविरुध्द संयुक्तपणे कार्यवाही करणार असे डॉ .विजय सुर्यवंशी यांनी सांगितले. या बैठकीत उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय आयुक्त तडवी, अधिक्षक गणेश पाटील, केशव राऊत, आदीत्य पवार आणि नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या चार जिल्हयांमधील पोलीस निरिक्षकांची उपस्थिती होती.