नांदेड(प्रतिनिधी)-फोन पे वर 40 हजार रुपये लाच मागणी करून 20 हजार रुपयांची लाच फोन पेवर स्विकारणाऱ्या मरखेलच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकासह जगाला तत्वज्ञान शिकवणाऱ्या पोलीस अंमलदाराविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांची नांदेड जिल्ह्यात नियुक्ती झाल्यानंतर अत्यंत धडकबाज कार्यवाही करत पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वात त्यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे भरपूर भारी काम केले. त्यानंतर त्यांची बदली झाली. पोलीस अधिक्षकांनी त्यांच्यावर विश्र्वास ठेवून त्यांना काही दिवस स्थानिक गुन्हा शाखेत आणले. त्यानंतर त्यांनी मला स्थानिक गुन्हा शाखा नको म्हणून मरखेल पोलीस ठाणे मिळवले आणि तेथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कार्यवाही केली आहे.
एका 45 वर्षीय तक्रारदाराने 23 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या अर्जानुसार त्यांची मौजे मरतोळी ता.देगलूर येथे शेत गट क्रमांक 101/1 च्या शिवारात एक हेक्टर वडीलोपार्जित शेती आहे. त्या शेतीमध्ये शेजारचे लोक वारंवार अडथळा आणत आहेत. म्हणून त्यांनी दिवाणी न्यायालय देगलूर यांच्याकडून मनाई हुकूम प्राप्त केला. न्यायालयाचे मनाई हुकूम घेवून तक्रारदार पोलीस ठाणे मरखेल येथे गेले आणि माझ्या शेतात अडथळा आणणाऱ्यांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यानंतर संकेत दिघे यांनी तक्रारदाराला प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावेळी जगाला भ्रष्टाचार करायचा नाही, भ्रष्टाचार चांगला नसतो असा संदेश देणारा पोलीस अंमलदार दिपक जोगे याने 40 हजार रुपये द्यावे लागतील असे तक्रारदाराला सांगितले. त्या 40 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपये रामदास शेरीकर या व्यक्तीच्या मोबाईलवर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने 20 हजार रुपये पाठविले.
या अर्जाची चौकशी करीत असतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या समोर हे निष्पन्न झाले की, सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस अंमलदार दिपक प्रल्हाद जोगे यांनी तक्रारदाराच्या शेताच्या शेजारी असलेल्या लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी 40 हजारांची लाच मागणी केली आहे आणि त्यातील 20 हजार रुपये फोन पेवर स्विकारले आहे. या सर्व प्रकरणासाठी मरखेल ता.देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जमीर नाईक आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी ही कार्यवाही पुर्ण केली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणीही शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करण्यासाठी त्या कामाच्या शासकीय फिस व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास दुरध्वनी क्रमांक 02462-253512 या क्रमांकावर किंवा टोल फ्रि क्रमांक 1064 वर अशा भ्रष्टाचाराची माहिती द्यावी.