अटकेत असलेल्या एका आरोपीला सशर्त जामीन मंजुर
नांदेड(प्रतिनिधी)-सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ए.पी.आय.संतोष शेकडे यांनी दिलेल्या तक्रारीतील एका अटक आरोपीला जामीन देतांना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी घटनेचा दुसरा सीसीटीव्ही उपलब्ध नाही आणि या आरोपीला सुरज गाडीवाले गॅंगचा सदस्य आहे असे म्हणता येत नाही या आधारावर सशर्त जामीन दिला आहे.
1 सप्टेंबर 2024 च्या सायंकाळी घडलेल्या पहिल्या आणि रात्री 10 वाजेच्यासुमारास दुसऱ्या घटनेला अनुसरून स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 118(1), 189, 191(2), 191(3), 194(1), 126(2), भारतीय हत्यार कायद्या कलम 3/5 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे दि.14 सप्टेंबर 2024 रोजी गुन्हा क्रमांक 460/2024 दाखल केला.
या प्रकरणात 18 सप्टेंबर रोजी नामनिर्देशित केलेल्या आरोपींमधील तेजस उर्फ बंटी प्रदीप मुटकुलवाड यास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली होती. 21 सप्टेंबर 2024 पासून तेजस न्यायालयीन कोठडीत होता.
तेजस मुटकुलवाडच्यावतीने ऍड.मुजाहिद सय्यद यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम 483 प्रमाणे जामीन अर्ज क्रमांक 764/2024 दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाने 10 ऑक्टोबर रोजी निर्णय दिला. या निर्णयात न्यायालयाने नमुद केले आहे की, फिर्याद ही हिअर से (कायद्याच्या भाषेत) आहे. भोकर फाटा येथील कला केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज आहेत. परंतू तीन तासानंतर नांदेड शहरात घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाहीत. तसेच या प्रकरणात ज्याला मारहाण झाली तो तक्रारदार तक्रार देण्यास तयार नाही. या सर्व परिस्थितीमध्ये जामीन मागणारा तेजस हा सुरज गाडीवाले यांच्या गॅंगचा सदस्य आहे असे म्हणता येत नाही. या आरोपीविरुध्द यापुर्वीचा कोणताही गुन्हेगारी अभिलेख उपलब्ध नाही. त्यामुळे तेजस मुटकुलवाडला तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजुर केला आहे.