नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे काल सायंकाळी झालेल्या एका धार्मिक प्रकरणातील तणावानंतर स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांनी स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसणाऱ्या काही पोलीस अंमलदारांना घेवून गेले खरे पण त्यांच्या मोबाईल लोकेशनची तपासणी केली तर त्यांचे लोकेशन पैन गंगा नदीच्या पलिकडे येणार आहे. हदगाव येथून प्राप्त केलेल्या खात्रीलायक माहितीनुसार त्या घटनेनंतर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने त्यांनी दोन-चार लोकांना अटक केली आहे. मग स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पैनगंगा नदीच्या पलिकडे काय कामगिरी करणार आहे.?
काल सायंकाळी हदगावमध्ये निघालेल्या एका मिरवणुकीनंतर तेथे दोन गटांमध्ये वाद झाला. त्याचे पडसाद उमटण्याअगोदरच पोलीसांनी प्रकरण आटोक्यात आणले. त्या प्रकरणाला स्थानिक पोलीसांची मदत करण्यासाठी नांदेड येथून सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांना पाठविण्यात आले. त्यांनी नांदेड येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार आणि स्थानिक गुन्हा शाखेतून 8 सप्टेंबर रोजी कार्यमुक्त केलेल्या पोलीस अंमलदारांपैकी तानाजी येळगे आणि मोतीराम पवार यांना घेवून हदगावला गेले. पण त्यांनी तेथे काय काम केले याची माहिती सर्वात चांगली हदगावचे पोलीस निरिक्षक देवू शकतील.तानाजी येळगे आणि मोतीराम पवार यांची नियुक्तीच स्थानिक गुन्हा शाखेत नाही. तरी पण ते स्थानिक गुन्हा शाखेत काम कसे करत आहेत. यातील तानाजी येळगे याच्या बदली आदेशात रिंदा पथक असे लिहिलेले आहे. आजच्या परिस्थितीत नांदेड जिल्ह्यात रिंदाच्या नावाने काही कामकाज होतात याचा कोणताही अभिलेख समोर आलेला नाही आणि रिंदा तर विदेशात आहे. मग त्याच्या नावाच्या पथकाची गरज काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
मागे दीड-दोन महिन्यापुर्वी सुध्दा असेच एक उत्कृष्ट कार्य स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले होते.एका खून प्रकरणातील आरोपीला पकडून त्याची भरपूर सेवा केली. त्या सेवेमुळे घाबरलेल्या पोलीस पथकाने त्या गुन्हेगाराला अंबेजोगाईतील शासकीय रुग्णालयात भरती केले. त्या संदर्भाने तेथे अभिलेख उपलब्ध आहे. तसेच दवाखान्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्यासोबत बरेच दिवस राहिलेल्या पोलीस अंमलदारांची छायाचित्रे सुध्दा कैद झाली असणारच.