नांदेड :- नांदेड शहरातील खाजगी व शासकीय सर्व होर्डिंग महानगरपालिकेने आज काढून टाकणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र व ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये देखील अशा पद्धतीचे कोणते होर्डिंग असतील तर ते काढून टाकावे असे निर्देश प्रशासनाने दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या 48 व 72 तासात करावयाची कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे प्रशासनाने आवाहन केले आहे.
*पहिल्या 48 तासात करावयाची कार्यवाही*
सर्वच केंद्र शासनाचे व राज्य शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मालकीचे, सार्वजनिक ठिकाणांवरील, मालमत्तेवरील, भुखंड, इमारती, जागा, संरक्षक भिंती मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील, रुग्णालये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, परिसर, पुल, उड्डाणपुल, विद्युत खांब, टेलिफोनचे खांब, बस, रेल्वे, विमाने, हेलिकॉप्टर, सर्व निमशासकीय वाहने, रुग्णवाहीका 2 इत्यादीवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी-माजी आमदार, मा.खासदार, मा.मंत्री महोदय, राजकीय व्यक्ती इत्यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य, जाहीराती निदर्शनास येऊ नये यासाठी त्यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्टीत करणे.
*पहिल्या 72 तासांत करावयाची कार्यवाही*
सर्व खासगी ठिकाणांवरील, मालमत्तेवरील, भुखंड, घरे, कार्यालये, इमारती, दुकाने, संरक्षक भिंती, आस्थापना व सर्वच खाजगी ठिकाणे, रुग्णालये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सर्व खाजगी वाहने, बस, रेल्वे, विमाने, हेलिकॉप्टर, रुग्णवाहीका इत्यादी राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्यक्ती इत्यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य निदर्शनास येऊ नये. यासाठी त्यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्टीत करणे.
ही कार्यवाही करण्यासाठी वरील प्रमाणे नमूद ठिकाणांची निश्चिती आपले अधिनस्थ यंत्रणेमार्फत तात्काळ करावी. तसेच विषयांकीत निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच वरील नमूद प्रमाणे तसेच पत्रात नमूद निर्देशांनुसार आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असेही आवाहन 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.