नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 14 वर्षीय बालिकेला फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर नामांकित धर्मस्थळाच्या गावात अत् याचार करणाऱ्या एकाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर .एम. पांडे यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला मदत करणाऱ्या दोघांची सुटका झाली आहे.
पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 जून 2021 रोजी ते सर्व घरी झोपले असतांना त्यांच्या 14 वर्षीय बालिकेच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवरून संदेश आला की, तु कुठे येणार आहेस. त्यानंतर ती आम्हाला काही न सांगता घराच्या बाहेर जाऊन घराची कडी बाहेरून लावून निघून गेली. तिने स्वत:चे आधार कार्ड, पॅनकार्ड, स्वत:चा मोबाईल घरीच ठेवला. या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी सुरूवातीला गुन्हा क्रमांक 184/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार दाखल केला. पोलीसांनी तपासचके्र फिरवून एका धर्मस्थळावरून या दोघांना पकडून नांदेडला आणले. त्यानंतर बालिकेने दिलेल्या जबाबानुसार हुलाजी भिमराव खांदाजे (26) रा.नंदनवन ता.कंधार, त्याच्यासोबत धीरज संतोष चिंतारे (19) रा.राजापूर ता.वसमत जि.हिंगोली आणि हुलाजीची पत्नी भाग्यश्री हुलाजी खांदाजे(29) या तिघांनी तिला चार चाकी वाहनात नांदेडपासून 300 किलो मिटर दुर असलेल्या एका धार्मिक स्थळावर नेले आणि तेथे लॉजवर तिच्यावर दि.12 जून 2021 आणि 13 जून 2021 रोजी अत्याचार केला. त्यामुळे या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 366, 366(अ), 370, 376(2)(एफ)(आय)(एन), 120 (ब), 506 आणि पोक्सो कायद्याची कलमे 4, 6, 8, 12 आणि 16 वाढविण्यात आली.
भाग्यनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले यांनी या प्रकरणाचा तपास करून हुलाजी खांदाजे, भाग्यश्री खांदाजे आणि धिरज चिंतारे या तिघांविरुध्द दोषारोप पत्र सादर केले. न्यायालयात हा विशेष खटला क्रमांक 97/2021 नुसार सुरू झाला. या न्यायालयीन प्रकरणामध्ये एकूण 7 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. घडलेला प्रकार हा अल्पवयीन बालिकेसोबत आहे, म्हणून तो प्रकार गंभीर आहे आणि आरोपीला शिक्षा देणे आवश्यक असल्याचा मुद्दा अतिरिक्त सरकारी वकील ऍड.अनुराधा कोकाटे यांनी मांडला. आरोपींच्यावतीने या प्रकरणात ऍड.डी.के.हांडे यांनी काम केले. उपलब्ध पुराव्याच्या आधारावर न्यायायाधीश पांडे यांनी 14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा हुलाजी भिमराव खांदाजे(26) यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सादीक पटेल यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.