नांदेड : -राज्य स्तरीय युवा महोत्सव विविध राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आज पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी वेळेत व नियमानुसार सर्व स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले.
आयुक्त क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड अंतर्गत सन 2024-25 मधील विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व राज्यस्तरीय महोत्सव आयोजन व नियोजन संदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीमध्ये सन 2024- 25 मधील राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा आर्चरी, बास्केटबॉल, विश्व बेसबॉल, बुद्धिबळ व सेपक टकरा व विनाअनुदानित राज्यस्तरीय खेळ स्पोर्ट्स व टेनिस हॉलीबॉल तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा बेसबॉल वयोगट 19 वर्षे मुले मुली व बुद्धिबळ 14 वर्षे मुले मुली सदर स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी नांदेड जिल्ह्याकडे देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने सदर स्पर्धेमध्ये विविध कामांचा आढावा घेण्यात आला आहे. राज्यस्तरीय युवा महोत्सव संदर्भात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकनृत्य,कौशल्य विकास कथालेखन, पोस्ट स्पर्धा, वक्तृत्व, फोटोग्राफी, संकल्पना आधारित स्पर्धा महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञानातून तृणधान्य वाढीसाठी विकास, समाजासाठी विज्ञान या संकल्पनेवर आधारित राहील. युवाकृती, हस्तकला, वस्त्र उद्योग, ॲग्रो प्रॉडक्ट व सायन्स मेला या कार्यक्रमांचा राज्यस्तरीय युवा महोत्सवमध्ये समावेश आहे. तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक, कृषी विषयक व विज्ञान विषयक प्रदर्शने या युवा महोत्सवमध्ये करण्यात येतील.
सदर बैठकीस एच. एम. नागरगोजे, उपसंचालक कृषी विभाग, रामचंद्र पाचंगे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डॉ. डी.टी शिरसाट, जिल्हा समन्वयक शिक्षण विभाग प्राथमिक, चंदा रावळकर जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र, डॉ. मल्लिकार्जुन काराजगी, डायरेक्टर, राष्ट्रीयसेवा विभागाचे समन्वयक, जयकुमार टेंभरे जिल्हा क्रीडा अधिकारी, संजय बेतीवार, राहुल श्रीरामवार क्रीडा अधिकारी, बालाजी शिरसीकर, बाळासाहेब डोंगरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक व विविध खेळ संघटनेचे पदाधिकारी वर्षा पाटील जोगदंड, बालाजी जोगदंड, विष्णु शिंदे, आनंदा कांबळे उपस्थित होते.