नांदेड(प्रतिनिधी)-माझ्याकडे चुकीला माफी नाही अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापुर इन्काऊटरवर उपस्थितांना प्रश्न विचारला की, पोलीसांनी बरोबर केले ना.
आज महिला सक्षमीकरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नांदेडमध्ये आले तेंव्हा बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खा.अशोक चव्हाण, आ.बालाजी कल्याणकर,आ.तुषार राठोड, आ.राजेश पवार, आ.शामसुंदर शिंदे, आ.भिमराव केराम, माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, गंगाधर बडूरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा कार्यक्रमस्थळी आल्यावर तेथे उभ्या असलेल्या राज्यमाता गायींना त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महिलांमधून स्टेजकडे पायी चालत त्यांनी अनेक महिलांच्या हाताने आपल्या हातावर राखी बांधून घेतल्या. याप्रसंगी पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी उशीरा आलो त्यासाठी मी माझ्या लाडक्या बहिणींची माफी मागतो. तुम्ही राख्या बांधतांना तुमच्या चेहऱ्यावर पाहिलेले समाधान मला छान वाटले. सत्ता येते-सत्ता जाते पण नाव मात्र कायम राहते. नांदेड हे धर्मस्थळ आहे, तिर्थस्थळ आहे. तसेच मर्मस्थळ आहे. लाडक्या बहिण योजने 2 कोटी 30 लाख बहिणी मला मिळाल्या. माझी तर एकच बहिण होती. आता त्यात एवढी वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात माझ्या 10 लाख बहिणी आहेत. महिला सक्षमीकरण योजना, अन्नपुर्ण योजना, महिलांना मोफत शिक्षण, युवकांना प्रशिक्षण आणि भत्ता योजना यामध्ये 6 हजार, 8 हजार, 10 हजार असे भत्ते दिले जात आहेत. लवकरच भाऊबीज येणार आहे. तेंव्हा मी तुम्हाला कायम स्वरुपी ओवाळणी देणार आहे. काही सावत्र भावांनी या योजनांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. हे सरकार पैसे देणार नाही. सरकार गेल्यावर योजना बंद पडतील असा अपप्रचार सुरू केला. माझ सरकार हे देणार सरकार आहे घेणार सरकार नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे काही दिवसात आचार संहिता लागू होईल म्हणून आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे बहिणीचे पैसे अग्रमी तुमच्या खात्यात जमा केले आहे. आजपर्यंत 17 हजार कोटी रुपये या योजनेसाठी खर्च झाले आहेत. एकूण 33 हजार कोटी रुपये या योजनेसाठी राखीव ठेवले आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार हप्ता घेणारे सरकार होते. त्यामुळे त्यांचा गृहमंत्री तुरूंगात गेला. कॉंगे्रसच्या वडेट्टीवार याने नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण मुंबई उच्च न्यायालयाने अशी एक याचिका अगोदर फेटाळली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सुध्दा न्यायालय ही याचिका स्विकारणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. उबाठा चे लोक सांगतात आमचे सरकार आल्यावर आम्ही योजना बंद करू. सरकारच येणार नाही तर योजना कोण बंद करेल असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. सर्वसामान्य महिलांना काय त्रास असतो याची जाणिव मला आहे. याचे उदाहरण सांगतांना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की माझी आई कशा प्रकारे तडजोड करत होती. याची जाणिव मला आहे. तुम्ही बळ दिले, ताकत दिली तर आजचे 1500 पुढे 2000 होती असे एकनाथ शिंदे म्हणाले. प्रसिध्द गायीका आशा भोसले यांनी सुध्दा या योजनेची तारीफ केल्याचे सांगितले. मी एकही योजना बंद करू देणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, माझे लाडके कामगार, माझे लाडके शेतकरी यांना माझी विनंती आहे की, सर्वांनी महायुतीच्या कामाचा पाढा वाचावा आणि मग होवू जावू दे सामना जनतेच्या दरबारात. तुमच सरकार परत आल पाहिजे ना असा प्रश्न उपस्थितांना विचारून महायुतीच्या सर्व उमेदवारांना आशिर्वाद द्या असे एकनाथ शिंदे म्हणाले.
या प्रसंगी खा.अशोक चव्हाण म्हणाले की, आजच 4500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. महिलांना दरवर्षी 18 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणूनच येत्या निवडणुकांमध्ये तुम्ही महायुतीला निवडुण द्या कारण आज तिजोरी रिकामी झाली तरी चालेल. पण ती सरकार आल्यावर आम्ही पुन्हा भरू. पुढची पाच वर्ष अत्यंत महत्वाची आहेत असे सांगत अशोक चव्हाण यांनी येत्या निवडणुकीत महायुती सरकार येणारच असे म्हणाले.
याप्रसंगी महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांमध्ये चांगले काम करणारे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला. उपस्थित मुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळींचा स्वागत कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सुरू झाला.