मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा नवा मोंढा मैदानावर आज महिला महामेळावा

 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार साधणार संवाद
  • मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांचा सन्मान
  • वाहतूक व्यवस्थेसाठी वाहनतळाची व्यवस्था
  • सर्वाना विनामुल्य प्रवेश, माध्यम प्रतिनिधीनी ओळखपत्र सोबत ठेवावे
  • विविध योजनांचे उद्घाटन
  • जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी

 

नांदेड  – राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या पथदर्शी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र व लाभ देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा या मैदानावर यासाठी हजारो महिला बसू शकतील असा मंडप उभारण्यात आला आहे. उद्या जिल्हाभरातील महिलांची उपस्थिती याठिकाणी असेल. सकाळी 11 पासून कार्यक्रमाला सुरूवात  होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांना दुपारी 4 च्या सुमारास संबोधित करणार आहेत.

या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री  तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, हिंगोलीचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची उपस्थिती असणार आहे.

महिला व बालकल्याण विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन नांदेड जिल्हा प्रशासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या सुरुवाताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यमाता-गोमाता पुजनाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर लखपती दीदी व इतर योजनांच्या स्टॉलचे  उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदय व मान्यवर लाभार्थ्यांशी भेट घेवून हितगुज करणार आहेत. यावेळी पोलीस बँडवर राज्यगीत सादर करण्यात येईल. तसेच यावेळी प्रशासनाच्यावतीने मान्यवरांचे स्वागताचा कार्यक्रम होणार असून लेझीम पथकाद्वारे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ वितरण करण्यात येणार आहे.

 

महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे भव्य आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर केले असून हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. नांदेड शहर व जिल्ह्यातील नागरिकांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाहून अनेक लाभार्थी व नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा केल्या आहेत. कार्यक्रम स्थळी योजनांचे स्टॉल उभारण्यात आले असून या स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

 

विविध योजनांचे उद्घाटन, भूमीपूजन व नामांतरण  

या कार्यक्रमात आत्मन ॲपचा शुभारंभ होणार आहे. तसेच बालीका पंचायत संकल्पनेचे लोकापर्ण, केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2 अभियानाअंतर्गत पाणी पुरवठयाचे बळकटीकरण व संलग्नीकरण या कामाचे भुमिपूजन, कै. नरहर कुरुंदकर स्मारक भूमिपुजन कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नवा मोंढा येथे भव्य मंडप उभारण्यात आला असून मंडपात विविध विभागाचे योजनांच्या स्टॉल उभारण्यात आले आहेत. हा कार्यक्रम नागरिकांना लाईव्ह पाहता येईल यांची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. उद्या या संदर्भातील लिंक समाज माध्यमावर जाहीर केली जाणार आहे.

 

पावसापासून संरक्षणासाठी व्यवस्था

पावसाळी वातावरण असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पावसापासून बचाव करणाऱ्या भव्य मंडपाची व्यवस्था केली आहे. हा मंडप पावसाची शक्यता लक्षात घेऊन उभारण्यात आला आहे. त्यामुळे उद्या नियोजित वेळीच कार्यक्रम होणार असून यासंदर्भात नागरिकांनी निश्चित असावे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

 

आढावा बैठक

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रुपाली रंगारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रेखा काळम-पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी तसेच आमदार बालाजी कल्याणकरही या ठिकाणी सहभागी झाले होते. उद्या येणाऱ्या महिलांच्या सुरक्षा, खाणपान तसेच प्रवासाच्या संदर्भात सर्व यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

माध्यम प्रतिनिधींसाठी आसन व्यवस्था

या कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी आसन व्यवस्था केली असून माध्यम प्रतिनिधीनी स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवावे. माध्यम प्रतिनिधींनी आपले ओळखपत्र दाखवून कक्षात प्रवेश करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!