नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात गो मातेला राज्य मातेचा दर्जा मिळाल्याने गो हत्या बंद होणार असे प्रतिपादन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केले.
4 ऑक्टोबर रोजी देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना ता.हिमायतनगर येथील भुमिपुजन कार्यक्रमात शेखर मुंदडा बोलत होते. महाराष्ट्रात गो हत्या बंद होणार आणि जे-जे लोक असे बेकायदेशीर कृत्य करतील त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. राज्यातील 1065 गो शाळांना लवकरच प्रति गोवंश आणि प्रति दिवस 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे गोशाळा स्वयंपुर्त होती. गोशाळांच्या आर्थिक बळकटीसाठी गोमय व गोमुत्राद्वारे गोशाळांना आर्थिक उत्पन्न मिळेल. आज तयार होणारे गोशाळेचे शेड पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा येथे येणार आहे. मी आणि माझी सर्व मंडळी किरण बिचेवार यांच्या सोबत आहोत. त्यात क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे यांचा समावेश आहे.
अतिशय प्रतिकुल प्रतिस्थितीचा सामना करत शेकडो गुन्हे दाखल करुन कसायांना जेरीस आणणाऱ्या किरण बिचेवार यांना प्रशासनाने त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या अधिकाऱ्यांना संघटनेच्या ताकतीचा परिणाम मिळाला. अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेवून गोरक्षणाचे कार्य अतिशय पारदर्शकपणे करणाऱ्या किरण बिचेवार यांचे शेखर मुंदड यांनी कौतुक केले.मागील 14 महिन्यात 248 गुन्हे दाखल करण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येत गुन्हे राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात दाखल झाले नाहीत. कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवणे, त्यांच्या अडीअडचणीत मदत करणे हे किरण बिचेवारांचे कौशल्य आहे.
गोसेवा आयोगातील सदस्य सुनिल सुर्यवंशी, प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष अशोक जैन, वर्धमान संस्कार धामचे सदस्य राजू शाह, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख, विशेष संपर्क प्रमुख अनिरुध्द केंद्रे, परमेश्र्वर मंदिराचे उपाध्यक्ष महाविर श्रीश्रीमाळ , विश्व हिंदु परिषदेचे शामजी रायेवाल, रामचंद्र पाटील, सुभाषराव बलपेलवाड, आशिष सकवान आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना किरण बिचेवार म्हणाले की, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून नांदेड जिल्ह्यात गोहत्येविरुध्द एक अभियान सुरू केले होते. निस्वार्थ कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने एकट्या नांदेड जिल्ह्यात गोरक्षणाचे ऐतिहासीक कार्य झालेले आहे. याचे सर्व श्रेय विश्र्व हिंदु परिषदेचे आहे. विपरीत परिस्थितीत संघटना आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते म्हणून आम्ही हे काम करू शकलो. आम्ही सर्वांचे आभारी आहोत असे किरण बिचेवार म्हणाले.